साहस आणि धैर्यासमवेत युवकांनी व्यक्तीमत्व जडण-घडणावर अधिक लक्ष देण्याची गरज - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक कॅम्पचा समारोप  


नांदेड|
राष्ट्रीय छात्रसेना ही एकता आण‍ि अनुशासन या ब्रिदवाक्याला अनुसरून शालेय शिक्षणापासून युवकांसाठी मोलाचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशाच्या सुरक्षिततेसंदर्भात जबाबदारीची भावना निर्माण करणे, सैन्यदलाविषयी आवड निर्माण करणे, देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले सहासी युवक तयार करण्यात राष्ट्रीय छात्रसेनेचा गौरवपूर्ण उल्लेख करावा लागेल. साहस आणि धैर्यासमवेत व्यक्तीगत पातळीवर आपल्या व्यक्तीमत्वाची जडणघडण यात होत असल्याने अधिकाधिक युवकांनी नागरिक म्हणून आपली जबाबदार भुमिका निभावण्यासाठी अधिक तत्पर व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 

मुगट येथे माता साहिब गुरूद्वारा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण कॉम्पच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी 20 महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमुख कर्नल एम. रंगाराव यांची उपस्थिती होती. 


राष्ट्रीय छात्रसेना लष्करा सारखा कडक युनिफॉर्म, कडक शिस्त, धाडसीवृत्ती व युद्ध प्रसंगी रणमैदानात उतरण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळून देते. 26 नोव्हेंबर 1948 ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली आहे. सन 1965 आणि 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात एनसीसीच्या छात्रांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष युद्धातही सहभाग घेतला असल्याची माहिती कर्नल एम. रंगाराव यांनी दिली. 

या वार्षिक प्रशिक्षण कॅम्पमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे, बालाजी जाधव यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. याचबरोबर पर्यावरण व इतर सामाजिक विषयावर लेफ्टनंन प्रशांत सराफ, अशो‍क शिंदे, सोपान साबळे, सुनिल भोसीकर, सुखदा नवशिंदे, देविदास ढवळे, मनिष कुलकर्णी आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गुजराथी हायस्कूल नांदेडचे मुख्याध्यापक रवी सुमठानकर, दामशेठ यांची उपस्थिती होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी