प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून जी-20 शिखर परिषद यशस्वी करूया - केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड -NNL


औरंगाबाद|
भारत, इटली व इंडोनेशिया हे तीन देश जी-20 परिषदेचे आयोजन करणार आहेत. त्या अनुषंगाने 13 व 14 फेब्रुवारी 2023 रोजी औरंगाबाद येथे होणारी जी-20 परिषद ' महिला व बालकल्याण ' या विषयावर आधारित असणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून आपल्याला जिल्ह्याचे ऐतिहासिक ,सांस्कृतिक तसेच औद्योगिक दर्शन जगाला घडविण्याची संधी मिळणार असल्याने प्रशासन आणि उद्योजकांच्या समन्वयातून ही परिषद यशस्वी करण्याचे आवाहन केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी आज येथे केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात जी-20 शिखर परिषदेच्या नियोजनाच्या आढावा बैठकीस रोजगार हमी योजना, फलोत्पादन तथा पालकमंत्री संदीपान भुमरे, सहकार आणि इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे, विशेष पोलीस महानिरीक्षक के.एम.मल्लिकार्जून प्रसन्ना, पोलीस आयुक्त डॉ.निखिल गुप्ता, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जी-20 परिषद केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने यशस्वी करण्यात येणार असून यासाठी राज्य शासनाकडून 50 कोटी रुपये इतका निधी उपलब्ध असल्याचे सांगुन श्री.कराड म्हणाले परिषदेच्या यशस्वीततेसाठी सर्व यंत्रणांनी आपापसात  समन्वय काम करावे.अनेक देशातील प्रतिनिधी येणार असल्याने  विद्यापीठातील भाषा विभागातील विद्यार्थ्यांबरोबरच अनेक भाषांचे जाणकार असणारे उद्योजक देखील परिषदेच्या प्रतिनिधींसोबत शहरासंबंधी माहिती देण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.  या परिषदेत एकूण 20 विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. यामध्ये आठ विषय हे अर्थ विषयक तर इतर 12 मुद्द्यामध्ये औद्योगिक, उद्योग, व्यापार, पर्यटन, आदी विषयांवर परिषदेचे प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. 

तसेच वेरूळ, अजिंठा, दौलताबाद येथील पर्यटन तसेच औद्योगिक क्षेत्रातील प्रगतीचीही पाहणी करणार आहेत. त्या अनुषगाने अजिंठा पर्यंतच्या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. जगभरातील सुमारे 500 प्रतिनिधी औरंगाबाद येथे भेट देणार आहेत. या प्रतिनिधींच्या निवास, सुरक्षा, वाहतूक तसेच इतर अनुषंगिक व्यवस्थेसोबतच वेरुळ, अजिंठा येथील सोईसुविधा, रस्त्यांची देखभाल दुरूस्ती, रस्त्यांवरील सूचना फलक, पाणी पुरवठा, आदी व्यवस्थेचाही आढावा श्री.कराड यांनी घेतला.

जी-20 परिषदेसाठी येणाऱ्या प्रतिनिधींना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासोबतच या कालावधीत वेरुळ महोत्सव तसेच सांस्कृतिक पंरपरेचे तसेच औद्योगिक व पर्यटन स्थळांचे दर्शन घडविण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन काटेकोरपणे करा, आलेल्या पाहुण्यांची निवास व्यवस्था, प्रवास व्यवस्था, आरोग्य सुविधा तसेच सर्व सोईसुविधा देण्याबाबत कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही, त्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना डॉ.कराड यांनी दिल्या.

बैठकीत पालकमंत्री श्री.भुमरे यांनी परिषदेच्या प्रतिनिधींची पैठण येथे भेट आयोजित करून त्यांना जायकवाडी धरण दाखवावे तसेच जागतिक पातळीवर नावारुपाला आलेल्या पैठणी निर्मिती केंद्राची देखील भेट घडवावी जेणेकरून  जागतिक पातळीवर पैठण नावारुपाला येईल अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तर मंत्री श्री.सावे यांनी शहरातील उद्योजकांची आणि परिषदेच्या प्रतिनिधींची चर्चा घडवून आणावी जेणेकरुन शहराच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने ही चर्चा महत्वपूर्ण राहील. सिडको बसस्थानक ते जाधववाडी रस्त्याच्या दुरूस्तीची मागणीदेखील त्यांनी यावेळी केली. त्याचबरोबर परिषदेच्या प्रतिनिधींशी संवाद साधण्याकरीता पुण्यातील भाषा अनुवादकांची मदत घ्यावी, अशा सूचना दिल्या.  जी-20 परिषदेच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सविस्तर माहिती दिली. औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक, भौगोलिक, औद्योगिक, सांस्कृतिक आदी विषयांसंबंधीच्या माहिती पुस्तिकेचे काम शेवटच्या टप्प्यात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी