हिमायतनगर। तालुक्यातील मौजे एकंबा येथील रहिवासी अभियंता प्रशांत भीमराव कानिंदे यांची वार्षिक 1. 44 कोटीचे पॅकेज देऊन विप्रोने कॅनडा येथे नियुक्ती केल्या बद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
पुणे येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या विप्रो या कंपनीत संगणक अभियंता म्हणून मागील दहा वर्षापासून तो कार्यरत आहे. कंपनी मध्ये त्यांनी मोठमोठ्या प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांना कंपनीच्या वतीने बरेच पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. त्यांच्या भरीव कार्याची दखल घेऊन कंपनीने त्यांना विशेष तांत्रिक तज्ज्ञ म्हणून सर्व सोईयुक्त आंतरराष्ट्रीय माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कामे हाताळण्याकामी कॅनडा येथे नियुक्ती दिली आहे. त्यांच्या नियुक्ती पत्रात त्यांचे वार्षिक पॅकेज 1. 44 कोटी राहणार असल्याचे नमूद केले आहे.
त्यांच्या या नियुक्ती बद्दल सार्वजनिक बांधकाम विभाग औरंगाबादचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभियंता संजय घोडके, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते गोविंद कानिंदे, बानाईचे अभियंता भरतकुमार कानिंदे, इब्टाचे जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम कानिंदे, डी. एस. भिसे, भीमराव धनजकर, वसंत वीर, मधुकर कांबळे, टी. पी. वाघमारे, आर.सी.कांबळे, अभि. प्रकाश अभंगे, विश्वास धुप्पे, अभियंता आशुतोष पाटील आदिंनी अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातून मागासवर्गीया मधून इतक्या मोठ्या रकमेचं पॅकेज मिळविणारा हा अद्वितीय असल्याचे बोलल्या जात आहे.
त्यांचे वडील भीमराव कानिंदे यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले परंतु आरोग्याच्या प्रश्नामुळे कुठेही नोकरी केली नाही. तर गावातच राहून समाजसेवा केली. याचे फलित म्हणून त्यांना ग्रामस्थांनी सरपंच पदी विराजमान केले होते. परंतु ग्रामपातळीवरील राजकारणात गर्क न होता. त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी नांदेड गाठले. त्यांचे काका बानाई व बाहाचे कार्यकर्ते अभियंता भरतकुमार कानिंदे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी अभियांत्रिकी शाखेत पदवी घेऊन विप्रो जॉईन केले. तिथे प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजाविले. म्हणूनच कंपनीने त्यांना मोठी सधी उपलब्ध करून दिली आहे. त्यांनी प्रशांतच्या या गगनभरारीबद्दल समाधन व्यक्त केले.