कार्यकारी अभियंता श्री कोरे यांनी जातीने लक्ष देण्याची होतेय मागणी
हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील सोनारी फाटा पासून ते जवळगाव पर्यंत राज्यरस्ताचे कामासाठी 3.5 कोटीच्या निधी मंजूर झाला आहे. या निधीतून डांबरीकरन आणि सिमेटीकरन तसेच एका पुलाचे काम करणे असं अंदाजपत्रकाचे स्वरूप आहे. सदरील काम नांदेडच्या ठेकेदारामार्फत केले जात आहे. परंतु या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसून येत असल्याचे ठेकेदार अभियंत्याच्या संगनमताने शासनाची निधीची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोप या भागातील शेतकरी व विकास प्रेमी जनतेनी केला आहे. हि बाब लक्षात घेता या कामाच्या गुणवत्तेची कार्यकारी अभियंता श्री कोरे यांनी जातीने चौकशी करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
हिमायतनगर - भोकर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सोनारी फाट्यापासून ते जवळगाव विरसनी गावाकडे जाणाऱ्या जवळगाव कमानीपर्यंत रस्त्याच्या कामासाठी CRIF च्या माध्यमातून राज्य रस्ता क्रमांक 263 चे काम 2560 मीटर रस्ता मंजूर झाला आहे. पैकी 2470 रास्ता काम करणे आहे. यासाठी 3 .5 कोटींचा निधी मंजूर असून, १५४० मीटरपर्यंत दोन कोट BBM +BC खालचा कोट वरचा कोट बीबीएम कार्पेट २.५ से.मी. करावा लागणार आहे. तर 370 मीटरचे खोदकाम करून WMM + BBM +BC 560 मीटर पूर्ण खोदकाम करून तीन लेयर पूर्ण आणि 1.5 मीटर खोदकाम 90 मीटर सिमेंट रास्ता करणे असे अंदाजपत्रकात नमूद आहे. यात एका ठिकाणी पुलाचे बांधकाम करायचे असून, माध्यम पूल, छोटा पूल प्रस्तावित आहे. सदरील काम नांदेडच्या ठेकेदाराकडून सुरू आहे. परंत्तू या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता दिसत असून, अंदाजपत्रकाला बगल देत थातूर माथूर पद्धतीने काम उरकण्याचा सपाटा अभियंत्याच्या संगणमताने संबंधित गुत्तेदाराने चालू केला आहे.
एव्हडेच नाहीतर या रस्त्यात केल्या जात असलेल्या पुलाच्या कामात रेतीएवजी डस्ट वापरली जात असून, डस्ट मध्ये सुद्धा मातीच माती दिसत असल्याने भविष्यात हा पुल टिकण्याची शक्यता कमी आहे. या प्रकारामुळे भविष्यात परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे मागील काही दिवसापूर्वी या पुलाच्या कामाच्या बाबतीत शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर यात काही सुधारणा झाल्याने काम सुरु झाले. परंत्तू पुन्हा ठेकेदाराकडून या कामात हेराफेरी करून थातुर माथूर पद्धतेने काम केले जात असल्याचे या भागातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
खरे सदरील रास्ता व पुलाचे काम करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पोपलवार यांनी उपस्थित राहून अंदाजपत्रकाप्रमाणे काम करून घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र ते रस्ता कामाच्या ठिकाणी न येता आपला खिसा गरम करून घेण्यात धन्यता मानत सोयीच्या ठिकाणी राहून उंटावरून शेळ्या हाकत आहेत. या याठिकाणी देखभालीसाठी कंत्राटी पद्धतीवर असलेल्या सफाई कामगाराला ठेऊन कामे उरकली जात आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाची गुणवत्ता ढासळली असून, अल्पावधीतच रस्त्यावर पुन्हा खड्डे होऊन शासनाचा कोट्यवधींचा निधी धुळीत मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तालुक्यात अश्या प्रकारे बोगस कामे सुरु असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुंगेनवार हे कंत्राटदारांची पाठराखण करत असल्याने साढेतीन कोटीच्या निधीतील कामाचा बोजवारा उडाल्याचे दिसते आहे.
याच गुत्तेदाराने दोन वर्षांपूर्वी सरसम बु. ते वाळकेवाडी गावाकडे जाणाऱ्या डांबरीकरण रस्त्याचे काम केले होते. हे कामदेखील बोगस झाल्यामुळे केवळ सहा महिन्यात या रस्त्याच्या डांबरीकरणावर चक्क गवत उगवले होते. अश्या गुत्तेदाराकडून गणवत्तापूर्ण कामाची काय अपेक्षा ठेवावी. आणि त्याच ठेकेदाराला हिमायतनगर तालुक्यातील अन्य रस्त्याची कामे देखील देण्यात आल्याने रस्ता कामाच्या गुणवत्तेबाबत विकास प्रेमी नागरीकातून साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे होत असलेल्या कामाची सोनारी फाटा ते जवळगाव पर्यंतच्या रस्त्याच्या कामाकडे कार्यकारी अभियंता श्री कोरे यांनी लक्ष देऊन होत असलेल्या कामाची गुणनियंत्रक मापक मशीनद्वारे चौकशी करावी आणि बोगस कामे थांबवावी आणि एकाच ठेकेदाराला विविध कामे कशी सुटतात याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होऊ लागली आहे.