डिसले गुरुजी यांच्यावर आरोप करणारे शिक्षणाधिकारी किरण लोहार लाच घेताना अटक-NNL

सोलापूर| सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.  25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतली आहे. ग्लोबल टीचर अवार्ड विजेते रणजित डिसले गुरुजी  यांच्यावर आरोप केल्यांतर शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार चर्चेत आले होते.स्वयं अर्थसहाय्य शाळेच्या युडायसवर सही करण्यासाठी शिक्षणाधिकारी लोहार यांनी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 25 हजार रुपये देण्याचे ठरले होते. आज ते स्वीकारताना लाच लुचपत विभागाने त्यांना रांगेहाथ ताब्यात घेतलं आहे.

याच किरण लोहार यांनी डिसले गुरुजींवर काही आरोप केले होते. त्यानंतर डिसले गुरुजींनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. शिक्षणाधिकारी किरण लोहार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील आहेत. कामकाजाच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त अधिकारी म्हणून लोहार यांच्यावर शिक्का मारण्यात आला. कोल्हापूरमधील लोहार यांची कारकीर्द तर चांगलीच गाजली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केले. शिवाय अनेक गंभीर तक्रारीवरूनच त्यांना जिल्हा परिषदेमधून एकतर्फी कार्यमुक्त केले. मात्र पुढे ते मॅटमध्ये गेले. लोहार यांच्या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृह एकदा बंद पडले होते.

किरण लोहार यांच्या वादग्रस्त कामकाजाच्या चौकशीचा अहवाल तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांकडे पाठवला होता.  चौकशी समितीने लोहार यांच्या कामकाजासंबंधी 43 तक्रारींची चौकशी केली होती. त्यामध्ये कर्तव्यात कसूर करणे, दप्तर दिरंगाई करणे, सरकारी नियमांचे उल्लंघन करणे,  हेतुपूर्वक जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गैरहजर राहणे असे आरोप लोहार यांच्यावर ठेवण्यात आले होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी