नायगाव/नांदेड। खरीब हंगाम २०२२-२३ या काळातील पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अग्रनी २५ टक्के प्रमाणे सोयाबीन पिकासाठी १०, ५०० रुपये प्रमाणे भरपाई देणे गरजेचे होते पण विमा कंपनीने ५ ते ६ हजार रुपये प्रति हेक्टरी देऊन शेतकऱ्यांना फसविले असा आरोप रयत क्रांती संघटनेच्या युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.
निवेदनात पांडुरंग शिंदे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ५ लाख २७ हजार ४९१ हेक्टर वरील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात जुलै महिण्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत सतत चालू असल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्याच्या हातात तोंडाला आलेला घास निसर्गाच्या अवकृपेमुळे हिसकावून घेतला आहे.
पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई अग्रनी २५ टक्के प्रमाणे सोयाबीन पिकासाठी १०, ५०० रुपये प्रमाणे भरपाई देणे नियमानुसार गरजेचे होते पण विमा कंपनीने ५ ते ६ हजार रुपये प्रति हेक्टरी देऊन शेतकऱ्यांना फसविले आहे. उर्वरित नुकसान भरपाई कापणी प्रयोग व कापणी पश्चात झालेल्या नुकसानाचे प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. फळबाग उत्पादक शेतकरी व इतर उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा पिक विमा तात्काळ लागू करावा. उर्वरित नुकसान भरपाई कापणी प्रयोग व कापणी पश्चात झालेल्या नुकसानाचे प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी.
अश्या मागणी करण्यात आल्या आणि शेतकऱ्याच्या हक्काच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात ही विनंती अन्यथा रयत क्रांती संघटना विमा कंपनी आणि जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल असे सांगण्यात आले आहे. या निवेदनाची प्रती मुख्यमंत्री , कृषिमंत्री ,महसूलमंत्री ,विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांना पाठवण्यात आले आहेत. यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, रयत क्रांती पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम वडजे, वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नितीन आबादार, अर्धापूर तालुकाध्यक्ष विठ्ठल इंगोले उपस्थित होते.