भटक्या जमातीने जपले इंदिराजींच्या तीन पिढ्यांशी ऋणानुबंध -NNL

"राहुल गांधींच्या आजीने आम्हाला सहकार्य केले, आता आम्ही त्यांना सहकार्य देणार".


काकांडी/नांदेड|
"आम्ही भटकी जमात, आज इथं तर उद्या तिथं...! इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी आम्हाला घरे दिली, पाच-पाच एकर जमिनी दिल्या. आता त्यांचा नातू येणार हाय म्हणून त्याला आशिर्वाद द्यायला आम्ही रस्त्यावर उभा हाय...!" सुमारे पासष्ट वर्षे वयाच्या सुशीला बाप्पा मांडवकर भावनिक होऊन सांगत होत्या. इंदिरा गांधी यांच्या तिसऱ्या पिढीशी सुद्धा त्यांचे ऋणानुबंध आणि त्यांना समाजात ओळख निर्माण करून दिल्याची जाणीव त्यांच्या भावनांमधून व्यक्त होत होती. सकाळी ८ च्या सुमारास काकांडी गावाजवळ  समाजातील १५ महिला मुलांसह रस्त्याच्या कडेला पदयात्रेची वाट पाहत दोन तास उभ्या होत्या. त्यांच्या मागे पडसर मैदानात त्यांच्या राहुट्या दिसत होत्या.

अशिक्षित, भटकी जमातीतील एक वयोवृद्ध महिला, पण त्यांची राजकीय सामाजिक प्रगल्भता प्रचंड होती. त्यामुळे 'तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्या आहात काय ?' या प्रश्नावर त्या म्हणाल्या, "आम्ही काँग्रेस कार्यकर्ते नाही. आम्ही हिंदू धर्माची माणसं, नाथपंथी हाय. त्यांच्या आजीने आम्हाला सहकार्य केले. आता राहुल गांधीला आम्ही सहकार्य देणार. त्याला निवडून देणार. त्यांच्या विरोधातल्या लोकांनी देशाला लई कठीण काळ आणलाय... पर राहुल गांधी जनतेसाठी भेटायला दारात आलाय. जनतेसाठी पैदल वारी करू लागलाय. म्हणून जनतेने त्यांच्या पाठीशी उभे राहिलेच पाहिजे."


'राहुलजींना भेटून काय सांगणार ?' या प्रश्नावर त्या म्हणाल्या कि आमचा समाज भिक्षेकरी. इंदिराजीनी जमिनी दिल्या. म्हणून आम्हाला गाव, नाव, ओळख मिळाली. पण आता दुष्काळ पडलाय, हाताला काम नाही. पोराबाळांची पोटं भरायला भटकत इथं आलो. भिक्षा मागून जगणं. मागे एकदा बेलपाडा येथे भिक्षा मागायला आमची लोकं गेली आणि त्यांना चोर समजून लोकांनी मारून टाकलं. दादा, आम्हाला घरे पाहिजेत, मुलाबाळांना शाळा पाहिजे, हाताला कामे पाहिजेत, काहीही करून ही भिक्षा आता सुटली पाहिजे...एवढंच आमचे म्हणणे हाय.  

गुरुवारी (दि. १० ) रोजी कापशी फाट्यावरून सुमारे सहाच्या सुमारास पदयात्रा सुरु झाली. सकाळच्या टप्प्यात १४ किलोमीटरचा प्रवास करून यात्रा नांदेडला पोहोचली. या प्रवासात गेल्या चार दिवसातील सर्वात मोठी गर्दी रस्त्यावर आज चौथ्या दिवशी पाहायला मिळाली. हबीब बागवान या कार्यकर्त्याने यात्रेकरूंसाठी मोफत फळे आणि पाणी बाबाटल्यांची व्यवस्था अनेक ठिकाणी केली होती.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी