उस्माननगर, माणिक भिसे| अखिल भारतीय समन्वयीत ज्वार सुधार प्रकल्प , वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी, तसेच अर्थसहाय्य आदिवासी उपयोजना ( टीएसपी) अंतर्गत नाविन्यपूर्ण रब्बी हंगामातील ज्वारीचे सुधारीत व संकरित वाण म्हणून परभणी मोती ( एसपीव्ही १४११) ,ज्योती ( एसपीव्ही १५१५/सीएसव्ही १८) सुपरमोती ,पीकेव्ही क्रांती, यासारख्या अनेक परभणी ज्वारी पिके शेतकऱ्यांसाठी उपयुक्त बियाणे आहे असे मत डॉ.दत्तप्रसाद वासरकर ( संचालक, संशोधन वनामकृवि, परभणी ) यांनी व्यक्त केले आहे.
केंद्र शासनाच्या अखिल भारतीय समन्वित ज्वार सुधार प्रकल्प अंतर्गत वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी च्या वतीने रविवारी दि. ३० रोजी उस्माननगर येथील ग्रामपंचायत सभागृहात रब्बी ज्वारी आद्यरेषीय पिक प्रात्यक्षिक घेण्यात आले. यात शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला.
वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी चे संचालक,संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, ज्वारी संशोधन केंद्र परभणी चे प्रभारी अधिकारी डॉ. एल, एन, जावळे, ज्वारी रोग शास्त्रज्ञ डॉ. के, डी, नवगरे, ज्वार किटक शास्त्रज्ञ डॉ. मोहम्मद इलियास, डॉ. अरविंद पांडागळे यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले.
सुवर्ण महोत्सवी वर्ष १९७२-२०२२ साजरा होत असताना विद्यापीठ माध्यमातून शेतकरी बांधवांना नवीन माहिती, तंत्रज्ञान, बियाणे, लागवड पद्धती, किफायतशीर शेती, उत्पादन वाढ या विषयावर तज्ञांनी विस्तृत माहिती दिली. रब्बी ज्वारीचे संकरीत व सुधारित वाण परभणी मोती, परभणी ज्योती, परभणी सुपर मोती, पी, के, व्ही, क्रांती आदी वाणांबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
उपस्थित निवडक शेतकरी यांना सुधारित बियाणे, औषधी, जैविक औषधींचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी उपसरपंच वैजनाथ पाटील घोरबांड ,अर्जुन घोरबांड , शिवदास वारकड, बालाजी पाटील, भगीरथ पाटील, संतोष घोरबांड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रितम भूतडा यांनी केले तर आभार कृषी सहाय्यक उबाळे यांनी केले. यावेळी गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.