भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा सहभाग; हिंगोली जिल्ह्यात भारत जोडो यात्रेचे भव्यदिव्य स्वागत -NNL


वारंगा/हदगाव, शे चांदपाशा।
 
भारत जोडो यात्रेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले. हिंगोली जिल्ह्यातील चोरंबा फाटा येथून ते पदयात्रेत सहभागी झाले. त्यांच्याबरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सचिन अहिर, नांदेडचे संपर्क प्रमुख, माजी खासदार सुभाष वानखेडे पदयात्रेत सुमारे पाच किलोमीटर चालले. यावेळी राहुलजी आणि आदित्य यांच्यात चर्चा रंगली होती. सुमारे सहाच्या सुमारास आदित्य ठाकरे पदयात्रेतून बाहेर पडले.


संध्याकाळी ७ वाजता वरंगा फाट्या येथे स्थानिकांशी राहुलजी गांधी यांनी संवाद साधला. यावेळी दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.


हिंगोली जिल्ह्यात पदयात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले. एकाचवेळी असंख्य मुखातून 'भारत जोडो'च्या घोषणा, हातात तिरंगी झेंडे...कौशल्याने कोरलेल्या मोठमोठ्या आकर्षक रांगोळ्या....आणि राहुलजी गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी खिळलेले हजारो डोळे...यात्रेतील हजारो नागरिकांच्या विराट जनसगराच्या साक्षीने सायंकाळी 4.14 वाजता पदयात्रेने हिंगोली जिल्ह्यात प्रवेश केला होता. यावेळी शेकडो शिवसैनिक हातात मशाली घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते.


भल्या मोठ्या प्रवेशद्वारच्या मागेपुढे सजलेल्या रांगोळ्या, वसुदेवांचे नृत्य, भवानीचे गोंधळी, धनगरी ढोलपथक, महिला झांजपथक आणि डौलात चालणाऱ्या हत्तीची सजवलेली अंबारी....चोरंबा फाटा येथून राहुलजी गांधी आणि आदित्य ठाकरे यांचे भव्य आणि दिमाखात स्वागत झाले. आमचे दुःख, आमचे कष्ट, आमची कैफियत ऐकायला कोणीतरी येत आहे याचा आनंद उपस्थितांच्या चेहऱ्यांवरून ओसंडून वाहत होता. मोठ्या उत्साहात प्रचंड गर्दी पुढे पुढे सरकत होती.


प्रचंड गर्दीत आणि गर्दीतून येणाऱ्या काही मोजक्या लोकांना सहजपणे भेटत, त्यांचे म्हणणे ऐकून घेत, कोणाशी फुटबाल खेळत, तर कोणाकडून मिळालेली काठी आणि घोगंड्याची प्रेमळ भेट स्वीकारत...राहुल गांधीची ऐतिहासिक पदयात्रा आज पाचव्या दिवशी हिंगोली जिल्ह्यातील वारंगा येथे सातच्या सुमारास दाखल झाली. चौक सभा झाल्यानंतर पदयात्रा विश्रांतीसाठी थांबली.



Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी