नांदेड| वाढत्या लोकसंख्येला पुरेसे पाणी पुरविण्यासाठी पाण्याचा पुनर्वापर करणे, पावसाळ्यातील पाणी अधिकाधिक प्रमाणात अडविण्या- जिरविण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. सर्वांनीच पाण्याचा जपून वापर करुन पाण्याचे योग्य नियोजन केले तरच भविष्यात पाणी टंचाई निर्माण होणार नाही. जलशिक्षण आणि जलसाक्षरता समाजात निर्माण होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन येथील साहित्यिक तथा मुख्याध्यापक गंगाधर ढवळे यांनी केले. ते जलसाक्षरता- पाण्याचे महत्व व त्याचा काटकसरीने वापर या विषयावर बोलत होते. यावेळी संतोष अंबुलगेकर, संतोष घटकार, हैदर शेख, आनंद गोडबोले, गंगाधर शिखरे, मारोती चक्रधर, कमल गच्चे, कैलास गोडबोले आदींची उपस्थिती होती.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शाळांमधून दर शुक्रवारी एक उपक्रम राबविण्यात येत आहे. जवळा देशमुख येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिल्याच शुक्रवारी 'जलसाक्षरता- पाण्याचे महत्व व त्याचा काटकसरीने वापर' या विषयावर शेतीच्या बांधावर कार्यक्रम घेऊन माहिती देण्यात आली. पुढे बोलताना ढवळे म्हणाले की, पाणी ही अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहे. तिला वाचविण्यासाठी आपण आपलीही जबाबदारी उचलायला हवी.
पाण्याचा वापर जपून केला तरच या संपत्तीचा आपल्यावर वरदहस्त राहून दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर आपल्याला मात करता येईल. पाण्याची उपलब्धता, दैनंदिन वापरासाठीची किमान गरज, मोठ्या प्रमाणावर होणारा पाण्याचा दुरूपयोग, टाळता येऊ शकणारी पाण्याची नासाडी याची जाणीव प्रत्येक नागरिकाला होणे गरजेचे आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी वर्षा संचयन, पाण्याचे पुनर्चक्रीकरण आणि पाण्याचा पुनर्वापर यासारख्या गोष्टी सुरू करणे आवश्यक आहे.
पाण्याचे साठे वाढवण्यासाठी जलयुक्त शिवारच्या माध्यमातून नदी, नाले आणि धरणातून गाळ काढण्याचे तसेच पाणी अडविण्याचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले पाहिजेत. त्यासाठी समाजातील विविध घटकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग मिळणे गरजेचे आहे. पाण्याचे संवर्धन होण्यासाठी जनजागृती महत्वाची असून शालेय विद्यार्थ्यांवर या वयातच जलसाक्षरतेचे संस्कार झाले पाहिजेत अशी अपेक्षा गंगाधर ढवळे यांनी यावेळी व्यक्त केली.