विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द कायम असावी - डॉ. भीमराव तलवाडे -NNL

युगसाक्षी साहित्य सभेकडून विद्यार्थी दिन साजरा; कांचननगरच्या प्राथमिक शाळेत 'एक वही - एक पेन' उपक्रम


नांदेड|
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श आपल्या जीवनात अंमलात आणतांना माझी शिकण्याची जिद्द कायम राहिली. पिढ्यानपिढ्या शिक्षणाची परंपरा नसलेल्या कुटुंबात राहून मी पीएचडी पर्यंत शिकलो. मी अजूनही शिकतोच आहे. अधिकाधिक ज्ञान मिळविण्यासाठी  विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द कायम असावी अशी अपेक्षा युगसाक्षी साहित्य सभेचे वरिष्ठ सल्लागार डॉ. भीमराव तलवाडे यांनी व्यक्त केली. 

ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी येथील साहित्यिक समीक्षक तथा युगसाक्षीचे प्रज्ञाधर ढवळे, मुख्याध्यापक गजानन डोईफोडे, आकाशवाणीचे आनंद गोडबोले, ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांची उपस्थिती होती. 

येथील युगसाक्षी साहित्य सभेच्या वतीने तालुक्यातील कांचननगर एकदरा येथील नवी आबादी प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. दिपावली निमित्त सुट्टी असूनही सकाळच्या वेळी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना एक वही एक पेन या उपक्रमांतर्गत साहित्य वाटप करण्यात आले. 

यानंतर प्रज्ञाधर ढवळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदर्श मानून अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत डॉ. भीमराव तलवाडे यांनी अनेक पदव्या, पदविका आणि पदव्युत्तर पदव्या मिळविल्या आहेत. त्यांची जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि प्रेरणा आजच्या विद्यार्थ्यांनी अंगिकारण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी गजानन डोईफोडे, नागोराव डोंगरे, अनुरत्न वाघमारे, आनंद गोडबोले यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी दिनानिमित्त तलवाडे यांना अनेकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी