नांदेड| मंगळवार दि.८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठिक ५ वाजता नगीनाघाट नांदेड येथे धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्यातर्फे सतत विसाव्या वर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या गोदावरी गंगापूजनाची जय्यत तयारी झाली असून यामध्ये एकसूत्रीपणा यावा यासाठी उपस्थित राहणाऱ्या 5000 महिला यावर्षी केशरी रंगाच्या साड्या परिधान करून येणार आहेत.नांदेडच्या गंगापूजनाची महती देश पातळीवर पोहोचवणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.
भाजपा महानगर नांदेड, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल, लायन्स क्लब नांदेड अन्नपूर्णा, अमरनाथ यात्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिक पौर्णिमेनिमित्त घेण्यात येणाऱ्या गोदावरी गंगापूजनामध्ये शेकडो महिला एकाच वेळी गोदावरीची आरती करतात. त्यानंतर आपल्या परिवारातील सदस्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी हजारो दिवे नदीपात्रात सोडले जातात. हे नयनमनोहर दृश्य पाहण्यासाठी नगीनाघाट वर दरवर्षी प्रचंड गर्दी असते.
प्रतिष्ठित व्यापारी योगेश जयस्वाल यांच्यातर्फे मोफत द्रोण, दिवे व फुले देण्यात येतात. आकर्षक पूजेची थाळी सजविणाऱ्या 21 महिलांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच गंगासागर यात्रा, नेपाळ यात्रा व केरळ यात्रा करण्यासाठी नाव नोंदणी केलेल्या भाविकांचा सन्मान करण्यात येणार आहे. संस्कार भारती तर्फे आकर्षक रांगोळी काढण्यात येणार आहे.
संतोषगुरु परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त पद्धतीने गोदावरी पूजन करण्यात येणार आहे. सालासार भजन मंडळातर्फे सवाद्य पाच आरत्या म्हणण्यात येणार आहे. उपस्थितांना मारवाडी युवा मंच तर्फे मसाला दूध वितरित करण्यात येणार आहे. कार्यक्रम संपल्यानंतर गुरुद्वारा लंगरसाहब तर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्याला नांदेडकरांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपाचे जिल्हा सरचिटणीस ॲड.दिलीप ठाकूर यांनी केले आहे.