नांदेड, अनिल मादसवार| हदगाव-हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी राजा पुरता हतबल झाला आहे. दि.२५,२६,२७,२८ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भारहून वाहिले. त्यामुळे पावसाचे आणि पुराचे पाणी शेतशिवारात शिरून शेतीतील सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी, हळद, ऊस, केळी आदी पिके नुकसानीत आली आहेत. कयाधू नदीचे पाणी आणि इसापूरचे पाणी पैनगंगा नदीत मिसळल्यामुळे जमिनी सुद्धा खरडून गेल्या आहेत.
यापूर्वी जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली तसेच दि.०६ व ७ सप्टेंबर रोजी देखील अतिवृष्टी झाली आहे. त्यानंतर नुकसानीचे पंचनामे सुरु झाले असताना परत २५ ते २८ सप्टेंबर काळात संतत मुसळधार पावसाने पिके पाण्यात येऊन हजारो हेक्टर हाता तोंडाशी आलेला सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा हतबल झाला असून, त्यांना या संकटातून काढण्यासाठी हिमायतनगर - हदगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. यासाठी संबंधितांना आदेशित करावे अशी मागणीही निवेदनातून केली आहे. यांनतर देखील जवळगावकरांनी पाठपुरावा करून बळीराजाला मदत मिळून द्यावी अशी रास्त अपेक्षा नुकसानग्रस्त शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे.