पैनगंगा नदीला तिसरा कालवा घोषित करून इसापूर प्रकल्पांतून पाणी सोडावे - खा. हेमंतभाऊ पाटील -NNL


हिमायतनगर/हदगाव।
पैनगंगा नदीला तिसरा कालवा घोषित करून इसापूर प्रकल्पांतून डाव्या आणी उजव्या कालव्या प्रमाणे पाणी सोडण्यात येवून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी हिंगोली लोक सभा मतदार संघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी केली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री ना.  एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनात खासदार हेमंतभाऊ पाटिल यांनी म्हटले आहे की, इसापूर धरण होण्या अगोदर पैनगंगा नदी ही बारमाही वाहत होती. धरण झाल्यानंतर पैनगंगा फक्त, पावसाळा,  हिवाळा या दोनच ऋतूत वाहत असून उन्हाळ्यात नदी कोरडी ठाक पडत आहे.  परिणामी नदी काठावरील नागरीकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई चा सामना करावा लागतो आहे.  दुसरी बाब अशी की,  पावसाळ्यात इसापूर प्रकल्प भरला की, पैनगंगेत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जातो. पुराच्या पाण्याने हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. 

डाव्या आणी उजव्या कालव्यात पाणी सोडल्या जाते, मराठवाडा, विदर्भ अश्या दोन्ही भागातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ मिळतो,  परंतू पावसाळ्यात ज्यांचे खरे नुकसान होत आहे.  अश्या पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही.  हे या भागातील शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्यायच होत आहे.  त्यामुळे पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून इसापूर प्रकल्पांतून पाणी सोडण्यात यावे,  जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध होवून शेतकरी समृद्ध होतील.  

या बाबीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून इसापूर प्रकल्पांतून पाणी सोडण्यात यावे.  अशी मागणी खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी केली असून खासदार पाटील यांच्या प्रयत्नाना सुयश आले आहे. लवकरच एक विशेष बैठक बोलावून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल.  असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी खासदार पाटील यांना दिले असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यावेळी हदगाव,  हिमायतनगर विधान सभेचे लोकनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांची प्रामूख्याने उपस्थिती होती.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची वसंत सहकारी साखर कारखान्यास भेट


लोकसभेतील खासदार हेमंतभाऊ पाटिल यांचे सहकारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ .श्रीकांत एकनाथजी  शिंदे माहूर येथे सपत्नीक श्रीरेणूका मातेच्या दर्शनासाठी आले असता . तत्पूर्वी त्यांनी वसंत सहकारी साखर कारखाना पोफाळी ता. उमरखेड जि. यवतमाळ येथे भेट दिली.  यावेळी त्यांचे  स्वागत केले. त्यांच्या सोबत सिनेअभिनेते मंगेश देसाई यांचीही उपस्थिती होती.

याप्रसंगी खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांनी उमरखेड, महागाव, पुसद, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचा कसा मिटवता येईल आणि पैनगंगा नदीचे शेतीसाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचे कसे नियोजन करता येईल या सर्व  मूलभूत बाबींचा आढावा घेतला. सोबतच जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी जलसंधारण, पाटबंधारे, विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून उर्ध्व पैनगंगा नदी लगतच्या बागायतदार शेतकऱ्यांना  पाणी उपलब्ध करून देण्या संदर्भात चर्चा केली . यावेळी खासदार हेमंतभाऊ पाटिल,  गोदावरी उद्योग समुहाच्या अध्यक्ष सौ. राजश्री पाटील, माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक( एमडी )  शैलेंद्र कटियार , अजय देशमुख सरसमकर, सदाशिव पुंड, प्रा. सुरेश कटकमवार, गव्हाणे, जगताप, गावंडे, कुरुंदकर यांच्यासह विविध विभागातील अधिकारी  आणि शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी