अर्धापूर। तालुक्यातील देळूब बु. येथील शेतकऱ्यांच्या ऊसाच्या शेतात विजेच्या तारांच्या स्पर्श होऊन शॉटसर्किटमुळे तब्बल ८ एकर ऊस जळाल्याची घटना शनिवारी (ता.१९) रोजी रात्री ९ वाजता घडली आहे.
देळूब बु. ता. अर्धापूर येथील शेतकरी पुरभाजी राजाराम शिंदे यांच्या शेतातील देळूब बु. शिवारातील गट क्रमांक २६४ मध्ये ५ एकर ऊसाच्या शेतांत महावितरण कंपनीचे विद्युत पुरवठाचे खांब आहेत. विद्युत पुरवठा सुरू असताना अचानकपणे विद्युत पुरवठाच्या ताराचा शॉटसर्किट होऊन ऊसाच्या फडाला आग लागल्याने ऊसाने पेट घेतल्याने ऊसाचा फड जळून पाच एकर ऊसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची नुकसान भरपाई द्यावी अशी प्रतिक्रिया शेतकरी पुरभाजी शिंदे पाटील यांनी यावेळी दिली.
तसेच त्यांच्या शेजारील शेतकरी अब्दुल लतीफ यांच्या शेतातील ३ एकर ऊस जळाला आहे. महावितरण कंपनीच्या विद्युत प्रवाहच्या तारा लोंबकळून ताराच्या स्पर्शाने ऊसाने पेट घेतला. शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण ८ एकर मधील ऊस जळून खाक झाला असून शेतकऱ्यांचे दहा लाखांचे नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी विज वितरण कंपनीने पावले उचलणे गरजेचे आहे. ऊस जळीत प्रकरणी मदत करावी अशी मागणी पुरभाजी शिंदे यांनी केली आहे.