नांदेड। जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन नियोजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना क्षेत्रातंर्गत व क्षेत्र बाहेरील तसेच राष्ट्रीय कृषी विकास योजना अनुसूचित जाती व जमाती या तिन्ही योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना जलसिंचनाच्या सुविधेसाठी विहिरीस अनुदान दिले जाते. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा विशेष उपक्रम जिल्ह्यात राबवला जात आहे.
यानिमित्त जिल्ह्यात आज 75 विहिरींचे जलपूजन करण्यात येणार आहे. नांदेड तालुक्यात कासारखेडा येथे एका लाभार्थ्यांच्या विहिरींचे जलपूजन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप माळोदे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातील पाच ठिकाणी लाभार्थ्यांच्या विहिरींचे जलपूजन गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी व कृषी अधिकारी यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि राष्ट्रीय कृषी विकास योजना अनुसूचित जाती जमाती या तिन्ही योजनेमध्ये सन 2020-21 व 2021-22 या वर्षात एकूण 860 विहिरींचे कामे पूर्ण झाली आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात असून त्यात सिंचनासाठी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या विहिरींचं जलपूजन आज केला जाणार आहे.