अशोकराव चव्हाण यांचे नियोजन राज्यात सर्वोत्तम
नांदेड, अनिल मादसवार। कन्याकुमारीपासून सुरू झालेली खा. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे. या यात्रेस प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः कर्नाटकातील रायचूर व तेलंगणातील हैदराबादमध्ये गर्दीचा विक्रम नोंदवला होता. परंतु नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी यात्रेचे जे सूक्ष्म नियोजन केले आह,े ते पाहता नांदेड जिल्ह्यात रायचूर व हैदराबादचा विक्रम नक्की तुटेल, असा विश्वास महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी एस. के. पाटील यांनी आज येथे व्यक्त केला.
येथील डॉ. शंकरराव चव्हाण स्मृती संग्रहालयात आयोजित केलेल्या प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकीस संबोधित करताना ते बोलत होते. या वेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सहप्रभारी संंपतकुमार, विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार सुरेश वरपूडकर, विधान परिषदेतील काँग्रेसचे प्रतोद आमदार अमरनाथ राजूरकर, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार जितेश अंतापूरकर, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर, अविनाश घाटे, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मितेंद्रसिंंग, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, समन्वयक विनायक देशमुख आदींची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, नांदेडमध्ये शिकण्यासाररखे खूप आहे. या ठिकाणची उत्कृष्ट व्यवस्था संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. राहूलजी यांच्यासोबत जास्तीचे काँग्रेस कार्यकर्ते व सामान्य नागरिक जोडणे गरजेचे आहे. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे निवृत्त न्यायमूर्ती, सहकार क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती यांची खासदार राहुल गांधी यांच्यासोबत नांदेडमध्येच भेट होणार आहे. अशोकराव चव्हाण यांच्यासाठी ही यात्रा भाग्यशाली ठरणार असून, केवळ अशोकराव चव्हाण यांच्या विनंतीवरून खासदार राहुल गांधी नांदेड जिल्ह्यात सहा दिवस मुक्कामी राहणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील ही यात्रा केवळ जिल्ह्याचे नव्हे, तर राज्याचे राजकारण बदलणारी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.
खा. मल्लिकार्जुन खरगे व खा. शरद पवार यांची उपस्थिती - अशोकराव चव्हाण
नांंदेड जिल्ह्यातून जाणार्या भारत जोडो यात्रेस काँग्रेस कार्यकर्त्यांसह नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. नांदेड येथे 10 रोजी होणार्या खासदार राहुल गांधी यांच्या जाहीर सभेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची उपस्थिती लाभणार आहे. शहरातून जाणार्या या यात्रेचे स्वागत दुतर्फा उभे राहून शहरातील नागरिक करणार आहेत. या यात्रेस मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी परभणी जिल्ह्याच्या पूर्णा, पालम या तालुक्यातून पाच हजारांपेक्षा अधिक काँग्रेस कार्यकर्ते व नागरिक उपस्थित राहणार असल्याचे आमदार सुरेश वरपूडकर यांनी या वेळी सांगितले, तर यात्रेसंदर्भातील तपशीलवार माहिती आमदार अमरनाथ राजूरकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकामधून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पांडागळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार गोविंदराव शिंंदे नागेलीकर यांनी मानले.