भरतीपूर्वीच तरुणांमध्ये चिंता......
मुंबई| महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी १८ हजार ३३१ पोलीस शिपाई पदांची मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत कागदपत्राबाबतची प्रमाणपत्र १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वषार्तील असावे. अन्यथा निवड रद्द केली जाईल, अशी सूचना दिली आहे. त्यामुळे आता नोव्हेंबर २०२२ मध्ये गेल्यावर्षीचे कागदपत्रे कशी काढावीत. यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे, तरी शासनाने तत्काळ नॉनक्रिमिलीयरच्या मुदतीमध्ये बदल करून शुद्धीपत्रक जाहीर करण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे.
मेगापोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई १४ हजार ९५६ पदे, पोलीस वाहनचालक २१७४ पदे तर सशस्त्र पोलीस शिपाई (एस.आर.पी.एफ.) १२०१ पदे अशी एकूण १८३३१ पदांची मेगा पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही आतापर्यंतची महाराष्ट्रातील सर्वात मोठी पोलीस भरती प्रकिया आहे. या भरतीमध्ये मुंबईला सर्वाधिक ७०७६ पोलीस शिपाई पदांची भरती प्रक्रिया होणार आहे. नव्याने निर्माण झालेल्या मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयामध्ये पहिल्यांदाच पोलीस भरती प्रक्रिया होत आहे.
महाराष्ट्रामध्ये ही पोलीस भरती प्रक्रिया (दि.3) नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. परंतु वय वाढीच्या मुद्द्यांमुळे ही भरती प्रक्रिया काहीशी पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर उमेदवारांना २ वर्षांची वय वाढ देण्यात येऊन ही भरती प्रक्रिया (दि.9) पासून सुरू करण्यात आली आहे. पोलीस शिपाई पदासाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची दि. ९ ते ३० नोव्हेंबरपर्यंत २१ दिवस असणार आहे. पोलीस शिपाई पदासांठी प्रथम ५० गुणांची शारीरीक चाचणी परीक्षा, १०० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
ही लेखी परीक्षा मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यातील पोलीस घटकांची एकाचदिवसी आयोजित केली जाणार आहे. शारीरीक चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार ११०: प्रमाणात १०० गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. लेखी परीक्षेत सुध्दा किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण १५० गुणांमधून केली जाणार आहे.
शुद्धिपत्रक जाहीर करावे – रूपनवर
बारामतीतील सह्याद्री करिअर ऍकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर म्हणाले की, दरवर्षीच्या भरती प्रक्रियेमध्ये पोलीस प्रशासनाकडून काहीतरी त्रुटी राहात असतात. यावर्षीच्या भरती प्रक्रियेतही कागदपत्राबाबतची एक सूचना देण्यात आली आहे. त्यामध्ये नॉनक्रिमिलीयर प्रमाणपत्र १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या वित्तीय वषार्तील असावे, अन्यथा निवड रद्द केली जाईल. अशी सूचना दिल्यामुळे महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे, की आता नोव्हेंबर २०२२ मध्ये गेल्या वर्षीचे कागदपत्रे कशी काढावीत. तरी शासनाने तत्काळ नॉनक्रिमिलीयरच्या मुदतीमध्ये बदल करून शुद्धिपत्रक जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.