हिमायतनगर| कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरु झालेल्या काकडा दिंडीचा दि.१० गुरुवारी शहरातील मुख्य रस्त्याने पालखी दिंडी काढून समारोप करण्यात आला आहे.
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कार्तीक मासात अखंड चालत आलेला काकडा आरती समाप्ती व सामुहिक तुलशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. येथील परमेश्वर मंदिरात असलेल्या माता तुलसी विवाह सोहळा मंदिर कमेटी व भजनी मंडळाच्या उपस्थितीत टाळ मृदंगाच्या वाणीत मंगलाष्टकाच्या मंजूर स्वरात थाटात संपन्न झाला. त्यानंतर आज समारोपाच्या निमित्ताने गुरुवारी शहरातील मुख्य रस्त्याने भव्य पालखी मिरवणूक काढून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले आहे.
या पालखी दिंडीत महिला भजनी मंडळ व पुरुष भजनी मंडळ मोठ्या सहभागी झाले होते. दिंडीची सुरुवात जेष्ठ संचालक लक्ष्मणराव शक्करगे यांच्या उपस्थिती करण्यात आली. यावेळी मंदिर कमिटीचे संचालक शांतीलाल श्रीश्रीमाळ, लताताई मुलंगे, मथुराबाई भोयर, अनिल मादसवार, विलास वानखेडे यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, दर्शनार्थी भक्त, बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेल्या पालखी दिंडी शहरातील मुख्य रस्त्याने निघाल्यानंतर महिला- पुरुष नागरिकांनी पालखीचे दर्शन घेऊन पुण्य प्राप्त केले. भक्तिमय वातावरणात निघालेल्या पालखी दिंडी परत आल्यानंतर भव्य महाप्रसादाने काकडा दिंडीचा समारोप करण्यात आला.