नांदेड| महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ६१ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर दुसर्या दिवशी ज्ञानसंस्कृती सेवाभावी संस्था, नांदेडच्या वतीने नाथा चितळे लिखित, भीमाशंकर निळेकर दिग्दर्शित “नरक चातुर्दशी” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.
संस्कार संस्कृती व आधुनिकता यांचे वास्तवदर्शी स्वरूप नाटकातून साकारले आहे. लेखक नाथा चितळे व दिग्दर्शक भीमाशंकर निळेकर यांनी संहिता व दृश्याची उभारणी यातून अगदी सामाजिक प्रश्नांवर प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडले. गोव्याला नरक चतुर्दशीचा उत्सव असतो. त्यानिमित्ताने फिल्म इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचा एक ग्रुप तिथे येतो. उत्सवाचा आधुनिक वारसा व त्याचे आधुनिक रूप या दोन्ही बाजू नाटकातील सर्वच कलाकारांनी खूपच सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांसमोर साकारल्या आहेत. नरकचतुर्दशी या नाटकात कृष्ण आणि नरकासुराचा वध हे दोन्हीही प्रतिकात्मक रूपाने मांडले आहे.
नरक चतुर्दशी या नाटकात 'निर्भया प्रकरण', गँगरेप या समस्येबाबत बोलताना, नरकासुराचा कथेचा आणि सोळा सहस्र स्त्रियांशी श्रीकृष्णाने केलेला विवाह या घटनेचा रूपक म्हणून वापर केला आहे. त्यातून 'केवळ बलात्काऱ्याला शिक्षा केल्याने समस्येचं निराकरण होणार नाही, तर ते पीडित स्त्रियांच्या पुनर्वसनाने होईल.' अशा प्रकारचा आशय समोर आणला आहे.
यात आरती चौरे, स्नेहा कदम, संजीवनी शिंदे, यांनी आशयपूर्ण भूमिका साकारली तर आदित्यराज उदावंत, अथर्व देशमुख, वैभव देशमुख, तुषार पाटील, राहुल भगत, शुभम मोरे, आर्या दुथड, बालाजी काळे, डॉ. आकाश हटकर, आयुष गावंडे, नागेश लोकडे, अपर्णा चितळे, गोविंद काळम, प्रीती चौरे, वैष्णवी आघाव, यांनी आप आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला.
या नाटकाची प्रकाशयोजना भीमाशंकर निळेकर, संगीत- साईनाथ विभूते, नेपथ्य- आनंद जाधव यांनी साकारली. आज. दि. १८ नोव्हेंबर रोजी जनजागृती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, मुदखेड यांच्या वतीने आकाश भालेराव लिखित, दिग्दर्शित “नाच्याच लग्न” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.