सांगोला-मिरज मार्गावर दिंडीत चालणाऱ्या वारकऱ्यांना गाडीने चिरडले, ७ जणांचा मृत्यू....NNL

मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत


सोलापुर|
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. कोल्हापूरहून पंढरपूरकडे कार्तिक वारीसाठी निघालेली दिंडी जुनोनी गावाजवळ पायी चालत होती.  या वारकऱ्यांच्या दिंडीत एक भरधाव गाडी घुसली. या दुर्घटनेत अनेक जण चिरडल्या गेले असून यामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत ८ जण गंभीर जखमी झाले असून, अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील जठारवाडी येथील गावकरी कार्तिक वारीच्या निमित्ताने विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरच्या दिशेने निघाले होते. वाटेत सांगोला तालुक्यातल्या जुनोनी गावाजवळ ही दिंडी पोहोचली होती. सायंकाळी दिंडी चालली असता भरधाव वेगात असलेला टेम्पो थेट दिंडीच्या दिशेने घुसली. या गाडीने १५ जणांना चिरडलं. त्यातील ७ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष तसेच एका लहान मुलाचा समावेश आहे. हा अपघात घडण्यासाठी जबाबदार असणाऱ्या टाटा नेक्सॉन गाडीतील दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे दोघेही सांगोला तालुक्यातील सोनंद या गावचे रहिवासी आहेत.

मृत वारकऱ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी