महाराष्ट्रातील किमान 20 ते 22 महत्त्वाच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे -NNL

प्रतापगडाप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ले इस्लामी अतिक्रमणांपासून मुक्त करावेत ! - श्री. नितीन शिंदे, माजी आमदार


मुंबई|
प्रतापगडाच्या पायथ्याशी ‘शिवप्रतापभूमी’वरील दर्गा, मशिद यांसह निर्माण केलेली अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यासाठी आम्ही ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’ची स्थापना करुन आम्ही संघटीतपणे लढा दिला. सध्या विविध गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आंदोलने करत आहे. 

विशेषकरून विशाळगडावरील अतिक्रमणांच्या मुक्तीसाठी समिती लढा देत आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याला असणारे अतिक्रमण हटवले, त्याप्रमाणे सरकारने महाराष्ट्रातील अन्य गड-किल्ल्यांवरील अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून त्यांना इस्लामी अतिक्रमणापासून मुक्त करावे आणि या सर्व गड-किल्ल्यांना पूर्वीचे गतवैभव प्राप्त करुन द्यावे, अशी मागणी माजी आमदार आणि ‘शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलना’चे निमंत्रक श्री. नितीन शिंदे यांनी केली. ते हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘प्रतापगडावरील अनधिकृत बांधकाम उद्ध्वस्त ! अन्य किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामांचे काय ?’ या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होते.

ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. पांडुरंग बलकवडे म्हणाले की, अफजलखानाने अनेक मंदिराचा विध्वंस केला आणि अनेक हिंदूंना बाटवले. याच अफजलखानाच्या कबरीचे अनधिकृत बांधकाम प्रतापगडाच्या पायथ्याशी करून त्याचे उद्दात्तीकरण करण्यात आले. या गोष्टींची सर्व शिवभक्तांना चीड येत होती. उच्च न्यायालयाने त्यावेळी अनधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश तत्कालीन राज्य सरकारला दिले असतांनाही त्याची अंमलबजावणी होत नव्हती. शेवटी सध्याच्या महाराष्ट्र सरकारने हे अनधिकृत बांधकाम तोडले, ही शिवभक्तांना आनंद देणारी गोष्ट आहे. या वेळी वाई, सातारा येथील प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक श्रीमती विजयाताई भोसले म्हणाल्या की, या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शिवभक्तांना माता भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद लाभले आहेत.

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, आताच्या सरकारने प्रतापगडावरील अतिक्रमण हटवले, ही सरकारची कृती अभिनंदनीय आहे. हा तर आरंभ आहे, असे आम्ही मानतो. महाराष्ट्रातील किमान 20 ते 22 महत्त्वाच्या गड-किल्ल्यांवर अतिक्रमणे झाली असून यांविषयी वन विभाग, राज्य आणि केंद्रीय पुरातत्त्व विभाग या सर्वांना माहिती असून ते या अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करत आहेत. वन विभाग, पुरातत्त्व विभाग यांच्यासह महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांवरील अतिक्रमणे हटवावीत, अशी समस्त हिंदू संघटनांची मागणी आहे. प्रत्येक गड-किल्ल्याचे संवर्धन करून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची स्मारके उभारली पाहिजेत, यासंदर्भात शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष घालावे, अशी आमची मागणी आहे.

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती,(संपर्क : 99879 66666)

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी