नांदेड| दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने यावर्षी नांदेड जिल्ह्यात मोठया प्रमाणात जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवसाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्वाच्या वेळा म्हणजे स्वयंपाक करण्यापुर्वी, स्वयंपाक झाल्यावर, शौचविधीहून आल्यानंतर, बाळाची शी धुतल्यानंतर, जेवणापुर्वी, जेवणानंतर इत्यादी बाबीसंदर्भात लोकशिक्षण घडवून आणण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून गावस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.
दिनांक 15 ऑक्टोबर रोजी गाव,शाळा व अंगणवाडीतून हात धुण्याचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. विशेष: शालेय स्तरावर करून मुलांना हात धुण्याच्या पध्दती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात जाणार आहे. तसेच जागतिक हात धुवा दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला व पोस्टर अशा विविध स्पर्धांचे आयोजन शालेय स्तरावर करण्यात येणार आहे. तरी जागतिक हात धुवा दिवस ग्रामपंचायतीसह सर्व पंचायत समिती, गट शिक्षणाधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात साजरा करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ यांनी केले आहे.
जागतिक हात धुवा दिन यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे लेखाधिकारी भाऊसाहेब कु-हे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, अधिक्षक अलकेश शिरशेटवार, दिलीप पवार, विशाल कदम, महेंद्र वाठोरे, चैतन्य तांदूळवाडीकर, कृष्णा गोपीवार, सुशिल मानवतकर, निकीशा इंगोले, कपेंद्र देसाई, माहिती, शिक्षण व संवाद सल्लागार डॉ. नंदलाल लोकडे आदी प्रयत्न करीत आहेत.