एक लाख ब्रास अवैध गौण खनिजाची चोरी; चौकशीची मागणी...
दोन दिवस उलटूनही अधिकाऱ्याचे मात्र याकडे दुर्लक्ष
हदगाव/नांदेड। तालुक्यातील वरवट/जांभळ सावली शिवारातील गायरान शेत जमिनीतून अवैधरीत्या कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लि.या कंपनीने गौण खनिजाचे उत्खनन केले आहे. त्यामुळे शासनाचा लाखोचा महसूल बुडाला असून ही बाब प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगून पण त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे गौण खनिज धारकासह प्रशासकीय अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात यावा अशा मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे हदगाव तालुका अध्यक्ष किरण वानखेडे यांनी दिनांक १० ऑक्टोंबर पासून उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आज दुसरा दिवस उलटूनही कोणत्याही अधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्याकडे येऊन चौकशी केली नसल्याचे आज तरी स्पष्ट दिसत आहे.
किरण वानखेडे यांनी निवेदनात नमूद केले आहे की दि. २५ ऑगस्ट २०२२ ते २३ सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये वरवट/जांभळ सावली या शिवारात कल्याण टोल कंपनीने गायरान/ माळरान जमिनीतून एक लाख ब्रास गौण खनिज अवैधरीत्या चोरून नेली आहे. त्यामुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडाला आहे. याशिवाय गौण खनिज वाहतूक करण्यासाठी के.टी.आय.एल. या कंपनीने २५ टन क्षमतेच्या डंपर/हायवा चा वापर केला असता वरवट ते वारंगा ४ कि.मी.रस्ता पूर्णपणे खचून गेला आहे.
तेव्हा अवैध्य उत्खनन करणाऱ्या व शासनाचा महसूल बुडवणाऱ्या कल्याण टोल या कंपनीवर दंडात्मक कारवाई करून २५ डंपर/हायवा ४ एस्केव्हेटर/जेसीबी जप्त करावी. तसेच या घटनेची माहिती संबंधित हदगाव येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना देऊन देखील त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या प्रकरणी त्यांच्यावर शिस्तभंगाची कार्यवाही व फौजदारी गुन्हा दाखल करावा अशा मागणीसाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे हदगाव तालुका अध्यक्ष किरण वानखेडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केल्याचे दिसून येत आहे.
हदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनाचे प्रमाण वाढले असून यासंदर्भात वेळोवेळी उपोषणकर्त्यांनी निवेदने देऊन देखील प्रशासनाकडून वेळेवर कारवाई होताना दिसून येत नाही. त्यामुळे पुढचे वास्तव्य म्हणजे उपोषण करता उपोषणास बसला असता त्यावेळी प्रशासनास जाग येऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली जात असल्याचे दिसून येत आहे निवेदन दिले त्याचवेळी प्रशासनाकडून ठोस कारवाही करण्याचे पाऊले उचलली जात नाहीत त्यामुळे तालुक्यात अवैध्य उत्खनन करणारी मोठी राजकीय निरपोळी निर्माण झाली असून त्यांच्यामार्फत रात्री बी रात्री देखील उत्खनन केले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे..