समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारांनी करावे - पालकमंत्री गिरीश बापट

वरुणराज भिडे स्मृती पत्रकार पुरस्कार प्रदान

पुणे, प्रतिनिधी/ 
पत्रकारितेकडे समाजाचे प्रबोधन आणि शासन व प्रशासनावर अंकूश ठेवण्याचे माध्यम म्हणून पाहिले जाते. दैनंदिन जिवनामध्ये घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब माध्यमांमध्ये उमटत असते. वरुणराज भिडे यांची निर्भीड पत्रकार म्हणून ओळख होती त्यांच्या  नावाने मिळालेल्या पुरस्कारामुळे पुरस्कार प्राप्त पत्रकारांची जबाबदारी वाढली आहे. पत्रकारांनी समाजाला दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.

एस.एम. जोशी सभागृहात आयोजित वरुणराज भिडे विश्वस्त मंडळाचे वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार प्रदान समारंभात पालकमंत्री बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार निळू दामले होते. व्यासपीठावर उल्हास पवार, वि.अ. जोशी, विकास वाळूंजकर, पुरस्कार प्राप्त पत्रकार संदीप प्रधान, शंतनू डोईफोडे, नम्रता वागळे, ज्ञानेश्वर बिजले आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री श्री. बापट यांनी पत्रकार वरुणराज भिडे यांच्या स्मृतीना उजाळा दिला. त्यांचे विधिमंडळ समालोचन यावरील लिखाण अभ्यासपूर्ण असायचे. पत्रकारिता हे समाजाला दिशा देणारे क्षेत्र आहे. बदलत्या काळानुसार पत्रकारांनी जास्तीत जास्त वाचन करुन आपल्या ज्ञानाची व्याप्ती वाढवावी, त्याचा वापर करुन समाजाच्या समस्या सरकार समोर मांडाव्यात, असे त्यांनी सांगितले. वरुणराज भिडे विश्वस्त मंडळाचा मुख्य पत्रकार पुरस्कार लोकमतचे संदीप प्रधान यांना प्रदान करण्यात  आला.  ग्रामीण भागात केलेले वृत्तांकन या विभागात दैनिक प्रजावणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांना तसेच  शहरी भागात केलेले वृत्तांकन या विभागात  सकाळचे ज्ञानेश्वर बिजले व इलेक्ट्रॉनिक मीडिया या क्षेत्रात केलेल्या विशेष कामगिरी या विभागात एबीपी माझाच्या वृत्त निवेदिका नम्रता वागळे यांना प्रदान करण्यात आले. 


निळू दामले
--------------
आपल्या प्रमुख भाषणात ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी आपल्या भाषणात स्वातंत्र्यपूर्व, स्वातंत्र्यानंतर आणि आताच्या बदलेल्या पत्रकारितेचा उहापोह केला. पत्रकार हा आपल्या व्यावसायाची एकनिष्ठ असला पाहिजे. त्यांच्या अंगी व्यासंग असावा. पत्रकारिता हे क्षेत्र निवडण्यापूर्वी जाणीवपूर्वक विचार करुन या क्षेत्रात पाऊल ठेवावे. काळानुसार अन्य क्षेत्रांबरोबर पत्रकारितेत बदल होणे स्वाभाविक आहे. परंतू आपण आपल्या लेखणीशी बांधील असावे. कुठल्याही अमिषाला बळी पडता कामा नये. आपण खऱ्या अर्थाने माहितीचे स्त्रोत असतो याचे भान ठेवणे आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन सकारात्मक पत्रकारितेसाठी त्याचा वापर करावा. मात्र सध्याची परिस्थिती पाहिजे तशी अनुकूल दिसत नाही. अभ्यासपूर्ण लिखाण व विवेचन कमी कमी होत चालले की काय अशी परिस्थिती दिसून येत आहे. तेव्हा या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुणांनी वाचन वाढवायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी प्रास्ताविकमध्ये उल्हास पवार यांनी पुरस्कारामागील भूमिका विषद केली आणि वरुणराज भिडे यांच्या निर्भिड पत्रकारितेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी पुरस्कार प्राप्त पत्रकार संदीप प्रधान, शंतनू डोईफोडे, नम्रता वागळे, ज्ञानेश्वर बिजले यांनी आपल्या मनोगतात आपापला अनुभव कथन केला. वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार मिळाल्याने आमची जबाबदारी अधिक वाढली आहे, अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी कार्यक्रमास अंकुश काकडे, एस.के. कुलकर्णी, रामदास फुटाणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सतीश देसाई यांनी केले. प्रजावणीचे संपादक शंतनू डोईफोडे यांनी पुरस्काराची रक्कम आणि  स्वत:जवळचे पाच हजार असे मिळून पंधरा हजार रुपये रक्कम कर्णबधीर संस्थेस दिले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी