नांदेड| नांदेडचे भूमिपुत्र तथा यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशदा, पुणे येथील अधिकारी, यशमंथनचे संपादक डॉ. बबन जोगदंड यांची ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या अनियतकालिके महाराष्ट्र प्रदेशध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
देशभरातील पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी व संघटनेच्या माध्यमातून समाजासाठी अनेक विधायक उपक्रम राबवण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेचे देशभर नेटवर्क निर्माण झाले असून महाराष्ट्रातही संघटनेचे अनेक पदाधिकारी आहेत. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच त्यांना दिले आहे.
डॉ. बबन जोगदंड हे मूळचे नांदेडचे रहिवासी असून त्यांनी नांदेडमध्ये बारा वर्षे पत्रकारितेत काम केले आहे. नांदेडच्या अनेक दैनिकांत ते वार्ताहर, उपसंपादक होते. त्यांनी पत्रकारितेत पीएचडीचे शिक्षण घेऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा यशदा या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत नोकरीला प्रारंभ केला. ते यशदाच्या माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख असून या माध्यमातून त्यांनी अनेक नवं उपक्रम सुरू केले आहेत. शिवाय त्यांचा महाराष्ट्रात प्रचंड जनसंपर्क असून त्यांच्यावर नुकतेच 'मानवी संबंधाचा बादशाह' हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे.
विशेष म्हणजे त्यांचा शिक्षणात विक्रम असून त्यांनी आतापर्यंत 25 विषयात पदव्या, प्रमाणपत्र, डिप्लोमा पूर्ण केले आहेत. त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित असून ते अनेक वर्तमानपत्रात, मासिकांमध्ये सातत्याने लेखन करत असतात. अनेक चळवळीमध्येही ते सक्रिय असून सामाजिक जाण,भान असलेले अधिकारी आहेत. पत्रकारितेत त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा एक वेगळा ठसा निर्माण केला आहे.
यशदाच्या यशमंथन या प्रसिद्ध असलेल्या मासिकाचे ते संपादक असून त्यांनी आतापर्यंत या मासिकामध्ये महाराष्ट्रातील शंभरहून अधिक सनदी अधिकाऱ्यांवर लेख लिहिले आहेत. त्याचबरोबर ते चांगले वक्ते, लेखक, सूत्रसंचालक, कवी, साहित्यिक, संघटकही आहेत. त्यामुळे त्यांची संघटनेच्या नियतकालिकेच्या राज्य अध्यक्षपदी निवड केल्याचे संदीप काळे यांनी सांगितले. त्यांच्या या निवडीबदल स्वागत होत आहे.