नांदेड। समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचे स्तोत्र पोहोचले पाहिजे ही धारणा मनात ठेवून शिक्षण महर्षी नागोराव जाधव यांनी जनता शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना करून शाळा,, महाविद्यालयासोबतच गुणवंत अध्यापक देण्यासाठी अध्यापक विद्यालये सुरू करून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत माधवराव पाटील शेळगावकर यांनी केले.
अध्यापक विद्यालय उमरदरी तालुका मुखेड येथे स.न. १९९२ ते १९९४ या काळात प्रशिक्षित अध्यापकांचा सौभद्र मंगल कार्यालय चैतन्यनगर, नांदेड येथे शनिवारी आयोजित स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यापक विद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य जी. एम. केंद्रे तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे स्वच्छ दूत माधवराव पाटील शेळगावकर, जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता. मुखेडचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव, पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, प्रा.एन. एम. भारसवडे, प्रा.कोणापूरे, प्रा.मंठाळकर,प्रा. गायकवाड, प्रा. शृंगारे, पत्रकार प्रल्हाद आयनेले, प्रा. जोशी आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमात सर्वप्रथम शिक्षण महर्षी नागोराव जाधव व सरस्वती च्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
पुढे बोलतांना शेळगावकर म्हणाले नांदेड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रामध्ये आत्मीयतेने काम करणारे दोनच व्यक्ती, त्यात माजी खा. केशवराव धोंडगे व शिक्षण महर्षी नागोरावजी जाधव त्यांच्या संस्थेने दिलेले अध्यापक गुणसंपन्न असून याचे सर्व श्रेय त्या-त्या संस्थेला जाते. शिक्षकापेक्षा मोठा माणूस मी कोणालाच मानीत नाही. आपण शिक्षक आहात,विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तळमळीने काम करा,दुसऱ्याला आनंद द्या,तुम्हाला आनंद मिळाल्याशिवाय राहणार बदलत्या काळात वैचारिक देवाण-घेवाणीसाठी अशा स्नेहसंमेलनाची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
ज्ञानाचा व भावनांचा संगम या स्नेहसंमेलनात घडवून आणलात ही अभिनंदन बाब आहे. देशाचे भवितव्य संसदेत घडत नाही तर ते चार भिंतीच्या शाळेत घडते, शिक्षक निर्मितीमध्ये शिक्षण महर्षी नागोराव जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम शिवाजीराव जाधव हे नेटाने करीत आहेत.तेव्हा शिक्षकांनी पूर्वतयारी करून अध्यापन करावे असे आवाहन पूर्व संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी केले.
महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा शिक्षण महर्षी नागोराव जाधव यांनी शैक्षणिक संस्था स्थापन करून पुढे चालू ठेवली. ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांची मुले शिकून नोकरीला लागली पाहिजे या उदात हेतूने अध्यापक विद्यालये सुरू केल्यामुळे उपेक्षित,वंचित,तळागाळातील विद्यार्थ्यांना डी.एड करण्याची संधी मिळाल्याने आज हजारो शिक्षक अनेक ठिकाणी कार्यरत राहून अध्यापनाचे चांगले कार्य करतात ही आमच्यासाठी गौरवाची बाब असल्याचे म्हणून शिवाजीराव जाधव यानी स्नेहसंमेलनाचे आयोजन करणाऱ्या संयोजकांचे अभिनंदन केले. स्नेहसंमेलनास महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातील शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मारुती हिंगमिरे, मारुती छप्परे,व्यंकट भोसले, आनंदा सोनटक्के, बारसे, जाधव, मारुती मुलकेवार, कोरबड,कोसकेवाड, बच्चेवार सिद्धेश्वरे, झाडे, सवर्णकार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजयकुमार झाडे, गोविंद स्वर्णकार तर उपस्थितांचे आभार सचिन जाधव यांनी मानले.