हिमायतनगरात शिधा वाटप उपक्रमाचा केला शुभारंभ
काही दुकानात आनंदाच्या शिधा वितरणातून एक ते दोन वस्तू गायब आणि १० रुपये जास्तीचे घेतले जातायत
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यात महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या आनंदाचा शिधा या उपक्रमाचा शुभारंभ आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी तहसीलदार गायकवाड यांच्या उपस्थितीत मौजे जवळगाव येथून केला. त्यानंतर हिमायतनगर शहरासह तालुक्यात आनंदाचा शिधा वाटप केला जात आहे. परंतु आनंदाचा शिधा देताना काही दुकानातून १ ते २ वस्तू कमी दिली जात एव्हडेच नाहीतर काहीजण १० रुपये जास्तीचे घेत असल्याने आनंदाचा शिधा वितरणात हेराफेरी होत आहे का...? असा प्रश्न आता लाभार्थ्यांचा पडला आहे. या संदर्भात आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी बातचीत केली असता ते काय..? म्हणाले आपणच वाचा आणि ऐका...
कोविड-19 च्या प्रार्दुभावानंतर दोन वर्षाने खुल्या दिलाने निर्बंधमुक्त वातावरणात आपण सर्वजण दिवाळी साजरी करीत आहोत. हि दिवाळी सर्व गोरगरिब नागरिकांसाठी आनंदाने व गोड पदार्थाने साजरी व्हावी यासाठी शासनाने “आनंदाचा शिधा” किटचे वाटप राज्यभर सुरु केले आहे. आनंदाच्या शिधा या उपक्रमातुन सर्वसामान्यांची दिवाळी आनंदाची व्हावी अशा शुभेच्छा किट वाटप कार्यक्रमात आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी शिधापत्रिका धारकांना दिल्या.
मात्र हिमायतनगर शहरातील काही दुकानातील किटमधून कुठे एक तर कुठे दोन वस्तू गायब असल्याचे दिसून आले आहे. तर काही स्वस्त धान्य दुकानदार तर १०० रुपयांच्या कीटसाठी चक्क ११० रुपये आकारात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाने गोरगरिबांसाठी उपलब्ध करून दिलेल्या या किटच्या पुरवठ्यातही काही दुकानदार हात धुऊन घेत असल्याने तहसील प्रशासनाच्या दुर्लक्षित कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्याशी नांदेड न्यूज लाइव्हने बातचीत केली असता त्यांनी सांगितले कि, शासनाकडून पाठविण्यात पैकेट मधील साहित्याचा कोठा कमी आल्यामुळे कुठे एक तर कुठे दोन वस्तू कमी दिल्या आहेत. पुन्हा तो माल आल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांना वितरित केला जाईल असे ते म्हणाले. हिमायतनगर शहरात १० ते १२ दुकाने आहेत. तर सर्वच दुकानावर समान वस्तू दिल्या जायला पाहिजे होत्या, मात्र कुठे कमी तर कुठे पूर्ण किट दिली जात आहे.
त्यामुळे गोरगरीब लाभार्थ्यामध्ये संभ्रम निर्माण होत असून, यामुळे धान्य वितरणात हेराफेरी करून गरिबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार तर होत नाही ना..? असा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. या सर्व बाबीचा आगामी ४ दिवसानंतर आढावा घेतला जाईल तशी सूचना तहसीलदार गायकवाड याना देऊ. खरे तर शासनाने गोरगरीब लाभार्थ्याना दिवाळीसाठी आनंदाची शिधा हि किट मोफत द्यायला पाहजे होती असेही आ.माधवराव पाटील जवळगावकर म्हणाले.
या संदर्भांत काही दुकानदारांशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, वरून साठा कमी आला आहे, आलेला साठा काही दुकानदाराना वितरित झाला तर काही दुकानदारांना झाला नाही. केवळ चणाडाळ वाटप थांबले आहे, त्यामुळे एक वस्तू कमी असल्याबद्दल किट देताना लाभार्थ्यांकडून ७५ रुपये घेत आहोत. चणाडाळ आल्यानंतर उर्वरित २५ रुपये घेऊन ती डाळीचे पैकेत लाभार्थ्यांना देऊ असे त्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले. यावेळी अनेक नागरिक, लाभार्थी उपस्थित होते.