नांदेड| महाराष्ट्रातील प्रकाशन क्षेत्रात अत्यंत मानाचा समजला जाणारा मुंबई मराठी साहित्य संघाचा 'वि. पु. भागवत प्रकाशन पुरस्कार' साहित्य चळवळीत मोलाचे योगदान देत असलेल्या नांदेड येथील इसाप प्रकाशनास जाहीर करण्यात आला आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाने नुकतेच आपले पुरस्कार घोषित केले असून त्यात प्रकाशन क्षेत्रातील वि. पु. भगवत पुरस्कार इसाप प्रकाशनास जाहीर केला आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच हजार रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. दि. २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या वर्धापनदिन सोहळ्यात हा पुरस्कार नामवंत शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे असे मुंबई मराठी साहित्य साहित्य संघ शाखेचे अशोक बेंडखळे यांनी कळविले आहे.
साहित्यिक व वाङ्मयचळवळीतील कार्यकर्ते दत्ता डांगे यांनी तीस वर्षांपूर्वी 'इसाप प्रकाशना'ची स्थापना केली आहे. 'सर्वांचे सुखी जीवन हेच माझे जीवन' हे ध्येयवाक्य घेऊन प्रकाशनाची वाटचाल चालू आहे. विशेषतः वाडी तांडे, खेडेगाव ते जिल्हास्तरावरील नवलेखक आणि लेखिकांची पुस्तके प्रकाशित करून त्यांना प्रकाशात आणण्याचा व मान्यवरांबरोबर व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आतापर्यंत इसाप प्रकाशनाने सहाशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. ही पुस्तके व महाराष्ट्रातील इतर प्रकाशनांनी प्रकाशित केलेल्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, आदी भाषेतील हजारो पुस्तकांची इसापने प्रदर्शने भरविली.
आजपर्यंत दोनशेहून अधिक प्रदर्शने गावपातळीपासून ते अ. भा. मराठी साहित्य संमेलनांतही भरविली. दहा लाखांहून अधिक या प्रदर्शनांतून वाचकांनी, महाविद्यालयांनी खरेदी केली आहेत. त्याचबरोबर आता या प्रकाशनाने स्वतःच गावोगाव मराठी साहित्य संस्कार संमेलने घ्यायला सुरुवात केली आहे. मान्यवर लेखकांचा सुवर्ण पदक देऊन गौरवही केला आहे. या सर्व कार्याची नोंद घेत मुंबई मराठी साहित्य संघाने हा पुरस्कार जाहीर केला आहे. सुप्रसिद्ध साहित्यिक एकनाथ आव्हाड व नारायण लाळे यांच्या निवड समितीने ही निवड केली आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे यांचे साहित्यिक आणि वाचकवर्गाकडून अभिनंदन होत आहे.