मुखेड, रणजित जामखेडकर| राज्यातील ० ते २० पटसंख्या असलेल्या जि .प . प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला असून बंद होणाऱ्या शाळेतील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचे काय ? असा भयानक प्रश्न निर्माण होत आहे.
दुर्गम आणी डोंगराळ भाग म्हणून ओळखले जाणाऱ्यां मुखेड तालुक्यातील हरिश्चंद्र तांडा,वसुर तांडा, रेखुसाखू तांडा,निमजगा तांडा,देवला तांडा,सकनुर तांडा, मुकुंद तांडा,सोनपेठवाडी, खैरकावाडी, मंग्याळतांडा , शिवलींगवाडी,चिंचगाव ,संगमवाडी (दापका गु.) ,यशवंतनगर (दापका गु), गवालेवाडी, नामदेवनगर (हाळणी) , होनानाईक तांडा,भोजु तांडा , कोटग्याळवाडी , रामचंद्र तांडा , नंदगाव (प.क), दापकाराजा तांडा, वर्ताळा तांडा , जांभळी तांडा, लोका तांडा , मांजरी तांडा , सोनपेठवाडी तांडा, मानसिंग तांडा , हुलगंडवाडी, सोसायटी तांडा, भासवाडी , रेखा नाईक तांडा, खपराळ, वाल्मिकवाडी , तुपदाळ ( बु ) , कासारवाडी , रेखुतांडा, ठाणा, उंद्री तांडा , रूपचंद्र तांडा, भाटापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होणार असल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे .
शिक्षणापासून व शाळाबाह्य १४ वयोगटापर्यंत एकही विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून पूर्वीच्या सरकारांनी वस्तीशाळा , साखरशाळा सुरु केल्या होत्या . यामुळे साक्षरतेचे प्रमाण वाढले होते . परंतु कमी पटसंख्या असलेल्या शाळा आता बंद होणार असल्याची माहिती खेड्या पाड्यात पसरली आहे. श्रीमंत पालकांची मुले बाहेरगावी राहुन शिकतील परंतु ज्या पालकांची आर्थिक बाजू नाजुक आहे. अश्या पालकांनी आपल्या मुलांच्या शिक्षणाच काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
शाळा बंद झाली तर या मुलांचे काय होणार ? हा प्रश्न पालकांना पडला आहे . जवळच्या शाळेत या .विद्यार्थांचे समायोजन केले तरी त्यांची ये - जा करण्यासाठी काय व्यवस्था होईल , असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत . या निर्णयामुळे काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती निर्माण होत आहे . दरम्यान , शाळा बंद बाबतचे स्वतंत्र पत्र शाळेला अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगितले आहे तरी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये व शिक्षणप्रेमी गावकऱ्यांनी या निर्णयाची धसकी घेतली आहे . यामुळे पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे .
पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याची कार्यवाही तात्काळ थांबवा - आ. डॉ. तुषार राठोड
शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात वस्ती तेथे शाळा हे धोरण शासनाने अवलंबले आहे त्यानुसार वस्ती , तांडे , दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात शाळा सुरु करण्यात आल्या होत्या त्यामुळे निश्चितच शाळाबाह्य विद्यार्थी प्रमाण कमी झाले आहे . कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळाचे प्रमाण कमी झाले आहे . कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या शाळाचे प्रमाण अतिशय दुर्गम तसेच वाडी , वस्ती , तांडे व आदिवासी बहूल क्षेत्रात मोठे आहे .
या शाळा बंद झाल्यास मुलांच्या विशेषतः मुलींच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होईल असे संबंधित संघटनेनी दिलेल्या निवेदनावरुन समजते. अर्थिक कारण दाखवून शिक्षणावारील खर्चात कोणतीही कपात करण्यात येऊ नये, तसेच विद्यार्थी संख्ये अभावी कोणतीही शाळा बंद करण्यात येऊ नये व प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी , शिक्षण विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे अशी मागणी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. डॉ तुषार राठोड यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.