नांदेड| तालुक्यातील वाघी जिल्हा परिषद हायस्कूल येथे खगोलदिनानिमित्त बाल विज्ञान महोत्सवांतर्गत विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यात १२० विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले तर वाघी व परिसरातील तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी या महोत्सवांतर्गत प्रयोग मांडणीचे निरीक्षण करून लाभ घेतला.
या विज्ञान महोत्सवाचे उद्घाटन प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले तर या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे, सरपंच गणपतराव राठोड, मुख्याध्यापक सुरेश बादशहा, सुदर्शन बिंगेवार, पी.एम. कुलकर्णी, श्रीधर जोशी, ऋषिकेश ढाके, राजकुमार गोटे, संजय शेळगे, विठ्ठल पवार, झोळगे व्ही.एन., रावसाहेब देवकत्ते आदी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाबद्दलची आवड निर्माण करणे आणि विकसीत करणे यासाठी आज रोजी- खगोल दिनानिमित्त प्रशालेत एकदिवसीय बाल विज्ञान महोत्सवांतर्गत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलतांना विज्ञानातील प्रयोगामुळे मुलांमधील जिज्ञासा वॄत्ती वाढीस लागते, वैज्ञानिक माहिती -पुस्तकाच्या वाचनातून वाढीस लागते, त्यामुळे विज्ञान विषयक पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी केले. मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठीच प्रभावी माध्यम म्हणजे विज्ञानातील प्रयोग करून पाहणे होय असे प्रतिपादन राज्यपुरस्कार प्राप्त शिक्षक डॉ. हेमंत कार्ले यांनी प्रास्ताविकेत केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांनीही विज्ञानातील माहिती रंजक स्वरूपात विद्यार्थ्यांना दिली.