नांदेड। यावर्षीची दिवाळी पहाट दरवर्षी प्रमाणे गोदावरी नदीच्या काठी बंदाघाटावर दि. 24, 25, 26 ऑक्टोबरपर्यंत रंगणार आहे. नांदेड शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील हजारो रसिक मंडळी या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी बंदाघाटवर जमतात.
यावर्षी पहिल्या दिवशी म्हणजे दि. 24 रोजी पहाटे 5.30 वाजता गुरुद्वारा शबद कीर्तन आणि गुरुबानीने दिवाळी पहाटचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर झी मराठी प्रस्तुत सारेगमा महासंग्रामातील ख्यातनाम, सिने पार्श्वगायक व भजनसम्राट ज्ञानेश्वर मेश्राम (माऊली) व याच सारेगम प्रवासातील दुसरे साथीदार डॉ. अनिकेत सराफ यांच्या संचाचे स्वप्न सुरांचे ही सुगम संगीताची मैफील सादर होणार आहे. या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन सुप्रसिद्ध निवेदक डॉ. नंदकुमार मुलमुले हे करणार आहेत.
दि. 25 रोजी पहाटे 5.30 वाजता पुणे येथील सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक हेमंत पेंडसे यांची सूर दिपावली या कार्यक्रमाची मेजवानी मिळणार आहे. अभंग, नाट्यगीते, बंदिशी या शास्त्रीय व उपशास्त्रीय प्रकाराची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती स्वयंवर प्रतिष्ठानचे प्रा. सुनिल नेरलकर यांची आहे. तर निवेदन सुप्रसिद्ध निवेदक व साहित्यिक श्रीकांत उमरीकर हे करणार आहेत. सोबत मुंबईचे ख्यातनाम वादक साथ संगतीसाठी लाभणार आहेत.
याच दिवशी सायंकाळी सांज दिवाळी या कार्यक्रमांतर्गत गझल संध्या हा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमाची निर्मिती कवी बापू दासरी यांची आहे. या कार्यक्रमात पुण्याचे सुप्रसिद्ध गजलकार प्रदिप निफाडकर व डॉ. अविनाश सांगोलेकर, निशांत पवार, रोहिणी पांडे, प्रज्ञा कुलकर्णी यांची उपस्थिती लाभणार आहे. व बापू दासरी हे सूत्रधार म्हणून सादरीकरण करतील. त्यानंतर 6.30 वाजता नृत्यतरंग हा कार्यक्रम सादर केला जाईल. यामध्ये गौरी देशपांडे, रागेश्री जोशी, गणेश काकडे, श्रुती पोरवाल, संस्कृती मुक्कीरवार, आदी कलावंत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना निलकंठ पाचंगे यांची असून निर्मिती डॉ. सान्वी जेठवाणी व शुभम विरकुरे यांची आहे.
तिसर्या दिवशी म्हणजे दि. 26 रोजी पहाटे 5.30 वाजता पाडवा पहाट या कार्यक्रमांतर्गत वसंत बहार हा कार्यक्रम सादर होईल. सुप्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई, वसंत प्रभू व वसंत पवार यांनी संगीतबद्ध केलेल्या अजरामर गीतांचा कार्यक्रम संपन्न होईल. या कार्यक्रमाची निर्मिती पत्रकार विजय जोशी यांची आहे. संकल्पना व निवेदन प्रसिद्ध निवेदक अॅड. गजानन पिंपरखेडे यांचे आहे.
या कार्यक्रमात अपुर्वा कुलकर्णी, आसावरी रवंदे, पौर्णिमा कांबळे, डॉ. कल्याणी जोशी, भाग्यश्री टोम्पे पाटील, ब्रह्मा कुलकर्णी, धनंजय कंधारकर, लक्ष्मीकांत रवंदे, ओंकार क्षीरसागर व स्वतः विजय जोशी हे कलावंत सहभागी होणार आहेत. औरंगाबाद येथील राजू जगधने, जगदीश व्यवहारे व अमित निर्मल तसेच ढोलकी वादक सुभाष जोगदंड, पंकज शिरभाते तसेच गौतम डावरे, सुनिल लामटीळे हे साथसंगत सांभाळणार आहेत. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन डॉ. प्रमोद देशपांडे व संगीतकार आनंदी विकास यांची आहे.
या कार्यक्रमात रसिक नांदेडकरांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नागरी सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष लक्ष्मण संगेवार, शंतनू डोईफोडे, समन्वयक निलकंठ पाचंगे, सचिव अॅड. गजानन पिंपरखेडे, प्रा. सुनिल नेरलकर, विजय जोशी, रत्नाकर आपस्तंभ, बापू दासरी, चारुदत्त चौधरी, उमाकांत जोशी, सुरेश जोंधळे, वसंत मैय्या, विजय होकर्णे, हर्षद शहा, आनंदी विकास, विजय बंडेवार, दिपक मुळे यांनी केले आहे.