किनवट, माधव सूर्यवंशी| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी किनवट व माहूर तालुक्याचा दौरा केला. या दौऱ्या दरम्यान त्यांनी राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा, राष्ट्रीय पोषण महा व माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानांतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे वाटप, घरकुलच्या चाव्याचे वितरण, जन्म मृत्यूचे प्रमाणपत्र, माझी मुलगी माझा स्वाभिमान या अभियानांतर्गत मुलींच्या नावांच्या पाट्यांचे वाटप, बेबी केअर किड्स आदींचे वाटप करण्यात आले.
पंचायत समिती किनवट येथे झालेल्या कार्यक्रमात आमदार भीमराव केराम, एसडीएम कीर्तीकिरण पुजार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, तहसीलदार जाधव, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती बोराट, आयुष अधिकारी डॉ. संदेश जाधव, गट विकास अधिकारी असेल एस.एन. धनवे, गटशिक्षणाधिकारी महामुने, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्यासह ईतर अधिकारी व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयामार्फत सकस आहारांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
किनवट तालुक्यातील घोटी, कामठाळा, लोणी अंतर्गत झेंडीगुडा, राजगड तांडा, माहूर तालुक्यात अंजनखेड, असोली, उमरा, पापलवाडी आदी गावांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. घोटी येथे पशुवैद्यकीय दवाखान्यात लंम्पी संदर्भात गाय वर्गातील जनावरांचे लसीकरण करण्यात आले. कामठाळा येथे कृषी विभागाच्या वतीने नवीन विहीरींच्या कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. लोणी ग्रामपंचायत अंतर्गत झेंडीगुडा येथील शेतकरी धनंजय नारायण भालेराव यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून देण्यात आलेल्या सिंचन विहिरीचे जलपूजन सीईओ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तर राजगड तांडा येथे सार्वजनिक शौचालयाचे भूमिपूजन करण्यात आले. दौऱ्या दरम्यान सरपंच, ग्रामसेवक, उप अभियंता, शाखा अभियंता, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.