मुखेड, रणजित जामखेडकर| एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी पदाचा प्रभारी पदासह पंचायत समितीचे प्रशासक सभापती असे विविध पदभार दिल्याने पंचायत समितीचा कारभार वन मॅन आर्मी झाला आहे.
मुखेड येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी तथा प्रभारी गटशिक्षणाधिकारी असलेल्या मिथुनकुमार नागमवाड यांची प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. गटविकास अधिकारी पद प्रभारी असल्याने तालुक्यातील सरपंचासह नागरिकांची हैराणी होतांना पहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सर्वांगिण विकासाला अडथळा निर्माण होत आहे.
पंचायत समितीचे सभापती पद हे देखील गेल्या ९ महिन्यापासून प्रशासक आहे. मुखेड सारख्या दुर्गम आणी डोंगराळ भागातील वर्ग १ दर्जाची पंचायत समिती असलेल्या पंचायत समितीला पुर्णवेळ गटविकास अधिकारी मिळत नसल्याने तालुक्यातील विकासाला चालना मिळणार नसल्याची चर्चा तालुक्यातील सुज्ञ नागरिकांतून ऐकावयास मिळते आहे. तर पंचायत समिती कार्यालयाचा कारभार वन मॅन आर्मी अशा झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून मुखेड पंचायत समितीला अनुभवी असलेले पुर्णवेळ गटविकास अधिकारी देवुन तालुक्यातील नागरिकांची गैरसोय थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रावण नरबागे यांनी दैनिक गाववाला प्रतिनिधी बोलतांना व्यक्त केली आहे.