नक्षलवाद संपवण्यासाठी पोलीस दल सक्षम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - NNL


गडचिरोली|
गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

भामरागड (जि. गडचिरोली) तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व जनजागरण मेळाव्याप्रसंगी तसेच आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी करताना ते बोलत होते. यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल आदी उपस्थित होते.

धोडराज येथील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागातील पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, यापूर्वी पालकमंत्री असतानासुद्धा अनेक ठिकाणी दुर्गम भागात आपण भेटी दिल्या. विकासाचे काम आता गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात होत असून रस्ते, पाणी, शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी मूलभूत सुविधांची निर्मिती करून हा भाग मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे.

गत दोन वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तसेच कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरिक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. पोलीस हा महत्त्वाचा घटक असून पोलिसांच्या पाठीमागे महाराष्ट्र शासन भक्कमपणे उभे आहे. तसेच आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गडचिरोलीत विविध योजना, नवीन उद्योग, लोकांच्या हाताला काम याबाबत सरकारने नियोजन केले आहे. पूर्वीचा गडचिरोली आणि आत्ताचा गडचिरोली यात आमुलाग्र बदल झालेला दिसत आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

यावेळी पोलीस महासंचालक रजनीश सेठ म्हणाले की, महाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवर येऊन जवानांचे मनोबल वाढवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री यांनी येथे दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला ही बाब संपूर्ण पोलीस जवानांसाठी अतिशय आनंदाची आहे. सरकारच्या पाठिंब्यामुळेच गडचिरोली पोलीस उत्कृष्ट काम करीत असून राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना  लोकांपर्यंत पोहोचविण्यात मदत होत आहे.

प्रास्ताविक पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला वीर बिरसा मुंडा आणि वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. तत्पूर्वी धोडराज येथील पोलीस मदत केंद्राच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रशासकीय इमारतीची पाहणी केली.

कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इरपे दोगे पल्लो, माळी गुमा मासा, शांती कुतु मज्जू, चैते चैतू पल्लो यांना साडीवाटप, राजे चैतु पुंगाटी, जैनी वड्डे, इंदरसाय गावडे यांना ब्लॅंकेट वाटप, रेश्मा सैनू मिच्छा हिला शिलाई मशीन, परी दिनेश पुंगाटी, मोहन वड्डे या बालकांना स्कूल बॅग तर बबलू देवाजी सिडाम, सोमजी विना पुंगाटी यांना फवारणी संच वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन विनीत पद्मावार यांनी तर आभार पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांनी मानले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस जवान तसेच त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी केली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी