किनवट/हिमायतनगर, शंकर बरडे। आधुनिकतेच्या नावाखाली पाश्चात्त्य संस्कृती कितीही घुसखोरी करीत असली तरी किनवट सारख्या मागास क्षेत्रात आदिवासी समाज अजूनही आपली संस्कृती टिकवून ठेवत आहेत. दस-यापासून दिवाळीपर्यंत चालणारे ढेमसा,दंडार नृत्य हा त्या परंपरेचाच एक भाग आहे.
महाराष्ट- तेलंगणा सीमेवरील नांदेड जिल्ह्यात येणाऱ्या किनवट तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. संगणक युगातही आदिवासी बांधव आपली संस्कृती, परंपरा कायम जपून आहेत. दंडार नृत्य हा त्यांचा सर्वात मोठा उत्सव विविध कलागुणांनी पारंपरिक नृत्यांनी ते साजरा करतात. त्यात दस-याच्या दिवसापासून आदिवासी बांधव देवदेवतांना साक्षी ठेवून पारंपरिक पोषाख परिधान करतात. मोराच्या पिसांचा टोप डोक्यात घालून जवळपास 15 ते 20 जण दंडार नृत्यासाठी सज्ज असतात. त्यातील एकास प्रमुख मानून त्याला घुसाडी ही उपमा देण्यात येते. तो साडी परिधान करून नाचतो.
साडी परिधान केलेल्यास विविध गीतांवर नृत्य करण्याची मुभा आहे. त्या व्यतिरिक्त इतर कोणीही पारंपरिक गाण्याशिवाय अथवा वाद्यांशिवाय नृत्य करू शकत नाही ही अट आहे. दस-यापासून दिवाळीपर्यंत मोरपिसाचा टोप घातलेला समुदाय कोणी झगा, कोणी साडी, तर कोणी पंजाबी ड्रेस घालून आदिवासी समाजातील प्रमुख समजल्या जाणा-या ढेमसा व तुडबुडी या वाद्यांवर ‘सुंदर असे नृत्य सादर करतात. दिवाळीच्या दिवशी हा समुदाय गावात घरोघरी दंडार नृत्य सादर करून देणगी जमा करतात.
दिवाळीच्या दिवशी घरोघर जाऊन पारंपरिक नृत्य सादर करून मिळवलेल्या देणगीतून आदिवासी समाजाचे कुलदैवत असलेल्या देवाला प्रसन्न करण्यासाठी बोकड व कोंबडीचा बळी देऊन त्यांचे मांस घरोघरी वाटप करून श्रद्धेने भोजन के ले जाते. विशेष म्हणजे मोरपिसांचा टोप डोक्यात घातलेला समुदाय दस-यापासून ते दिवाळीपर्यंत आंघोळ करीत नाही व आपल्या घरीसुद्धा जात नाही.
शासनाकडून उपेक्षा - विविध कलागुण आत्मसात केलेल्या या समाजास शासनाने त्यांच्या कलेला वाव मिळावा यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्यांच्यात लपलेला कलाकार जगासमोर यावा यासाठी शासनाने प्रयत्न केल्यास ही महत्त्वपूर्ण भारतीय कला, संस्कृती व परंपरा जगासमोर येईल. सांस्कृतिक ठेवा जतन करणा-या आदिवासी समाजास मात्र शासनाने आजपर्यंत उपेक्षितच ठेवले आहे.