नविन नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन 'क' झोन कुस्ती स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक आणि रोप्य पदकाचा बहुमान प्राप्त केला आहे.
विद्यापीठाच्या या कुस्ती स्पर्धा मुदखेड येथील राजीव गांधी महाविद्यालयात घेण्यात आल्या. या स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी बाबरी दलवीर सिंग इंद्रजीत सिंग यांने १२५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. महाविद्यालयाचा बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी गोविंद माधव पिंकलवाड यांने ६१ किलोग्रॅम वजन गटामध्ये रोप्य पदकाची कमाई करून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवला.
कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक आणि रौप्य पदकाचे मानकरी ठरलेल्या दोनही गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयामध्ये सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. नानासाहेब जाधव,अॅड. श्रीनिवास जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ.साहेबराव मोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.