नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि विष्णुपुरी येथील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘राष्ट्रचेतना-२०२२’ दि. ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. या महोत्सवाचे उद्धाघाटन दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वा. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) चे माजी संचालक प्रविण मेहता यांच्या शुभ हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. जोगेन्द्र्सिंह बिसेन, जेष्ठ समाजसेविका डॉ. सुधा कांकरिया, प्रकाश कांकरिया, विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध सिनेअभिनेते आदिनाथ कोठारे, जेष्ठ अभिनेत्री सुप्रिया पाठारे आणि महाराष्ट्र राज्य संयोजक आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ०७:३० वा. ‘लढा स्वातंत्र्याचा - गाथा बलिदानाची’ या विषयावर शोभायात्रा नांदेड शहरातील जुना मोंढा ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे. या युवक महोत्सवात एकूण २८ कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील ९२ महाविद्यालयांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. या युवक महोत्सवामध्ये नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यामधून ८०५ विद्यार्थिनी आणि ५२५ विद्यार्थी असे एकूण १३३०विद्यार्थी कलावंत सहभागी होणार आहेत.
एकूण पाच मंचावरती महाराष्ट्राच्या लोककला, ललित कला, संगीत कला, वाड्मय कला व नाट्य या विभागांतर्गत २८ कलाप्रकारांच सादरीकरण होणार आहे. मुख्यमंचाला लोककालांतर्गत ‘लोकशाहीर वामनदादा कर्डक कला मंच’ हे नाव देण्यात आले आहे. ललित कलेचे सादरीकरण ‘कलामहर्षी बाबुराव पेंटर’ या कला मंचावर होणार आहे. संगीत विभागातील ‘मोहम्मद रफी स्वरमंच’, वाड्मय विभागातील सादरीकरण ‘यशवंतराव चव्हाण विचार मंच’ व नाट्य विभागातील सादरीकरण ‘जयवंत दळवी’ या नाट्यमंचावर होणार आहे. युवक महोत्सवातील कला प्रकारांच्या परीक्षणासाठी संबंधित क्षेत्रातील ४०परीक्षकांना निमंत्रित करण्यात आले आहे. या युवक महोत्सवाचे वेगळेपण म्हणजे सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती या युवक महोत्सवासाठी लाभणार आहे.
एकूण चार दिवस चालणाऱ्या या युवक महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ दि.१२ ऑक्टोंबर २०२२रोजी सकाळी ११:३०वा. होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे राहणार आहेत. प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या शुभहस्ते बक्षीस व पारितोषिक वितरण होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन, औरंगाबाद येथील प्रसिद्ध उद्योजक अनिलजी पाटील, बालाजी शिंदे, आसेगाव येथील हॅपी इंडियन व्हिलेजचे संस्थापक रवि बापटले हे राहणार आहेत. अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी दिली. यावेळी ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे प्राचार्य डॉ. विजय पवार, विद्यापीठाचे विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची उपस्थिती होती.