नांदेड। जिल्ह्यातील दिव्यांग शाळेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन तब्बल दोन महिने थकल्याने गणेशोत्सव, नवरात्र व दसरा सणात शिमग्याचा अनुभव घेतलेल्या कर्मचाऱ्यांना पदभार स्वीकारताच जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांनी वेतन काढून दिवाळी गोड केली आहे. या समाजकल्याण अधिकाऱ्याचे आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन निर्मल सहकर्मचाऱ्यांनी पुष्पवृष्टी करत अनोखे स्वागत केले आहे.
बहुतांश अधिकारी आपल्या कार्यपद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना हवेहवेसे वाटतात. या अधिकाऱ्यात जि.प. समाजकल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांचा समावेश करावा लागेल. दिव्यांग शाळेची गुणवत्ता वाढावी, पात्र दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा व कर्मचाऱ्यांना वेळेत व नियमित वेतन व्हावे यासाठी आऊलवार यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. असाच अनुभव त्यांच्या मागच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांना आला आहे.
नव्याने पुन्हा समाजकल्याण अधिकारी पदी सत्येंद्र आऊलवार येणार असल्याच्या सुखद वार्तेने कर्मचाऱ्यात चैतन्य निर्माण झाले होते. मंगळवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सत्येंद्र आऊलवार यांनी पदभार स्वीकारल्याचे समजताच दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, कर्मचाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले तर आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन निर्मल व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत अनोखे केलेले स्वागत जिल्हा परिषदेत चर्चेचा विषय ठरला आहे.