भोकर/नांदेड| जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील मौजे सावरगाव मेट येथे एका बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या वाहनावर २८ सप्टेंबर रोजी जमावाकडून दगडफेक झाली होती. जमावाने बोगस डॉक्टरलाही सोडवून घेत औषधीही पळवली होती. याप्रकरणी २९ सप्टेंबर रोजी उशिरा भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर तहसीलदार यांनी एक भरारी पथक नेमले असून, तालुक्यातील बोगस डॉक्टरवर हे पथक कार्यवाही करणार आहे.
भोकर तालुक्यात बोगस डॉक्टरबद्दलची माहिती मिळाल्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहुल वाघमारे हे पथकावर कारवाईसाठी सावरगाव मेट येथे गेले होते. तेथे डमी रुग्ण चक्रधर खानसोळे यांना उपचारासाठी पाठवले. तेव्हा डॉ. वाघमारे पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी बोगस डॉक्टर हिमांशू मिश्रा विश्वास एका रुग्णास तपासताना आढळला. डॉ. वाघमारे यांनी डॉक्टरकडील औषध व वैद्यकीय उपकरणे जप्त केली.
डॉक्टरला घेऊन भोकरकडे निघाले असता जमावाने आरोग्य अधिकाऱ्यांचे वाहन अडवून त्यावर दगडफेक केली. जमावाने वाहनातील जप्त केलेली औषधी हिसकावून घेत पळवली. सोबत बोगस डॉक्टरला त्या वाहनातून पळवले होते. या प्रकरणात आता गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक दिगंबर पाटील हे तपास करत आहेत. त्यानंतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत काळ्या फिती लावून कार्यवाहीची मागणी केली आहे. त्यानंतर तहसीलदार यांनी एक विशेष पथक स्थापन करून तालुक्यात आलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने भरारी पथक काम करून बोगस डॉक्टरवर कार्यवाही करेल असे सांगितले आहे.