जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्साहात साजरा
डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन सभागृहात सामाजिक न्याय विभाग व ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव डी. एम. जज, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. आश्विनी जगताप, फेसकॉमचे अध्यक्ष अशोक तेरकर, ॲड सिद्दीकी, गायत्री परिवाराचे ज्येष्ठ नागरिक वसंतराव बारडकर, दत्तात्रय काळे, संध्या छाया वृध्दाश्रमाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पाटोदेकर तसेच जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती.
ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकिय सुविधापासून इतर सुविधा वेळीच उपलब्ध व्हाव्यात यासाठी भारत सरकार तर्फे व्यापक दृष्टिकोन ठेवला आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत या योजनांमधून गरजू पात्र लाभार्थ्यांना वैद्यकिय सुविधा, मोफत उपचार अंगिकृत रुग्णालयामध्ये दिले जातात. ज्येष्ठ नागरिकांना अधिक सुविधा देण्याचा मानस असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.
ज्येष्ठांसाठी कायदा करावा लागतो हाच मुळात माणुस म्हणून आपल्या संवेदनेचा, सामाजिक नैतिकतेचा पराभव आहे. समाजाने याचे शल्य बाळगले पाहिजे. ज्या दिवशी या कायद्याची कोणत्याही ज्येष्ठांना गरज पडणार नाही तेंव्हाच या कायद्याचा उद्देश सफल झाला असे म्हणता येईल, या शब्दात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अप्रत्यक्ष आपली कटिबद्धता व्यक्त केली. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद घेऊन मी नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर रुजू झालो. योगायोगाने हा पहिलाच कार्यक्रम जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचा असून ज्येष्ठांचे आशीर्वाद घेण्याची ही अनोखी संधी मिळाल्याची भावना त्यांनी बोलून दाखविली. ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी संनियत्रण समिती आहे. संनियत्रण समितीमार्फत प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेऊन वेळोवेळी आवश्यक ते नियोजन करू असे त्यांनी सांगितले.
आपली संस्कृती संयुक्त कुटुंबाची आहे. अलिकडच्या काळात आता एकत्र कुटुंब पद्धती राहिली नसल्याने ज्येष्ठांच्या प्रश्नांनी वेगळे रुप घेतले आहे. आश्रम याला पर्याय जरी असला तरी केवळ जेवन, राहण्याच्या सुविधेपुरते मर्यादीत राहून चालणार नाही. यापलीकडे व्यापक विचार करून प्रत्येकाचा सन्मान, स्वाभिमान जपला जाईल, त्यांना त्यांच्या भावनाही व्यक्त करता येऊ शकतील असे वातावरण असले पाहिजे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधीश डी. एम. जज यांनी सांगितले.
प्रारंभी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात वसंतराव बारडकर, स्वातंत्र्य सैनिक विष्णुपंत पुराणिक व ज्येष्ठांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बापु दासरी यांनी केले.