नांदेड। नांदेड शहरातील तरोडा बुद्रुक परिसरातील विकास नगर येथे 66 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी लीलाताई भद्रे व वंदनाताई लोखंडे यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी सामूहिकरीत्या त्रिशरण पंचशील व इतर गाथांचे पठण करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. श्याम दवणे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व सांगितले. सचिव परमेश्वर दिपके भाषणात म्हणाले, तथागत भगवान बुद्धांनी विजयादशमी दिनी धम्मदेशना दिली होती. इ.स.पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजया दशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरयेथे लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला म्हणूनच विजयादशमी दिनी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येत असल्याचे परमेश्वर दिपके यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर सोनाळे यांनी तर उपस्थितांचे आभार शामराव हटकर यांनी मानले. कार्यक्रम नंतर मिठाईवाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला परिसर अभियांत्रिकी गृहनिर्माण सोसायटीचे कोषाध्यक्ष पांडुरंग तारू, सल्लागार मनोहर भास्करे, अशोक कावळे, दिलीप कांबळे, एस. वाय. हनुमंते, गंगाधर लोखंडे, प्रल्हाद हनुमंते, दीपक पवार, भीमराव लोहाळे, सुमेध पाईकराव, विजय सोनसळे,अशोक आठवले, प्रतीक्षा दवणे,शिलाताई तारू, पंचशीला हटकर, प्रेमिला लोहाळे, शितल हनुमंते, मनीषा कावळे यांच्यासह महिला व बालक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.