जीव धोक्यात घालून विद्युत रोहीत्रावर जाऊन बसून आंदोलन केले
२० दिवसापासून असलेल्या अंधारामुळे पळसपुर येथील नागरीक झाले आक्रमक
हिमायतनगर, विष्णू जाधव| हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथे मागील २० दिवसांपासून विद्युत पुरवठा ठप्प झाला आहे. महावितरण अधिकाऱ्यांना वेळो वेळी सुचना देऊनही दखल घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे गावकर्यांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. काल दि. २२ सप्टेंबर रोजी गावातील नागरीक आपला जीव धोक्यात घालून विद्युत रोहीत्रावर जाऊन बसून आंदोलन केले होते. तात्काळ त्या विद्युत रोहीत्रावर येणारा विद्युत पुरवठा खंडीत केल्यामुळे पुढील अनुचित घटना टळली. महावितरणच्या अधिकाऱ्यांना याविषयी बराच वेळ संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु तब्बल तीन तासानंतर कार्यकारी उप कार्यकारी अभियंता यांनी फोन द्वारे उत्तर दिले. अशा बेजाबबदार अधिकाऱ्यांमुळे नागरीकांचे प्राण धोक्यात येत आहेत. जर या ठिकाणी कोणतीही विपरीत घटना घडली असती तर महावितरणचे अधिकारी याला जबाबदार राहीले असते.
पळसपुर येथे महावितरणचे विद्युत उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात सुविधा, कर्मचारी यांचा प्रामुख्याने अभाव असल्याचे दिसून येते. येथील विद्युत पुरवठा सतत खंडीत होत असून, सिंगल फेजचे विद्युत रोहीत्र निकामी झाले आहे. निकामी झालेले विद्युत रोहीत्र बदलले नसल्याने गावातील विद्युत पुरवठा खंडीत असून पिठाच्या गिरण्या बंद झाल्याने नागरीकंना गहू, ज्वारीचे दळण दळणासाठी तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. गावात मजुर वर्ग मोठा असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर शेतात राबावे लागते. त्यामुळे अनेक नागरीकांना तालुक्याच्या ठिकाणी येणे शक्य नसल्याने वरण -भात खाऊनचं दोन्ही वेळचे जेवण करून पोट भरावे लागत आहेत.
विद्युत पुरवठा नसल्याने घरातील पंखे बंद आहेत याचा मोठ्या फटका नागरीकांसह लहान बाळांना घरातील डांसांचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने आजारी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. निकामी झालेले विद्युत रोहीत्र पाठवणे महावितरणने बंद करावे. गावाला १००-१०० चे दोन विद्युत रोहीत्र तात्काळ मंजुर करून गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. अन्यथा येत्या २७ सप्टेंबर रोजी महावितरण कार्यालया समोर अमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजीक संघटनेचे कार्यकर्ते यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी इशारा दिला आहे.