सहभागी होण्याचे आवाहन
नांदेड| एफटीआयआय पुणे यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत सुरु केलेले चित्रपट विषयक लघुअभ्यासक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आयोजित करण्यात आले आहेत. हे लघुअभ्यासक्रम पुर्णतः मोफत असून अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी केले आहे.
विद्यापीठ परिसरातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाने लघुअभ्यासक्रमाच्या आयोजना संदर्भात पुढाकार घेतला आहे. दि. ३ ऑक्टोबर पासून पुढील काळात चित्रपट आस्वाद, स्मार्टफोन चित्रपट निर्मिती, अभिनय आणि पटकथा लेखन या विषयावर चार स्वतंत्र अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने आयोजित करण्यात आले आहेत. एफटीआयआय पुणे यांच्या वतीने देशातील विविध ठिकाणी या लघु अभ्यासक्रमाचे यापुर्वी आयोजन करण्यात आले आहे. त्याच मालिकेत हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. असे नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. राजाराम माने यांनी कळवले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ या उपक्रमांतर्गत करण्यात येणाऱ्या लघुअभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्त्वाने अठरा वर्षावरील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सदरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. अभ्यासक्रमांत एफटीआयआय पुणे येथील प्राध्यापक तसेच चित्रपट क्षेत्रातील देश पातळीवरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. असे या अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. पृथ्वीराज तौर म्हणाले.
लघु अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी ललित व प्रयोगजीवी कला संकुलातील डॉ. अनुराधा पत्की, प्रा. राहुल गायकवाड, प्रा. कैलास पुप्पुलवाड यांच्याशी संपर्क साधावा व नोंदणी करावी. असे आवाहन ललित कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले आहे.