नांदेड| नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात शिवसेनेशी गद्दारी करुन शिंदे गटात सहभागी झालेल्या मंडळींना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवून त्यांना त्यांची जागा दाखविण्यासाठी आजपासूनच कंबर कसून कामाला लागा. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समित्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन शिवसेनेचे नांदेड-हिंगोली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी येथे केले.
पुण्यातील गद्दारावर दगडफेक झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर संपर्वâप्रमुख बबनराव थोरात यांचे पहिल्यांदाच नांदेड येथे आगमन झाले. त्यांचे शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. आज शासकीय विश्रामगृहात पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, नागेश पाटील आष्टीकर, युवासेनेचे सहसचिव माधव पावडे, सहसंपर्वâप्रमुख प्रकाश मारावार, भुजंग पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक निकिता चव्हाण, वत्सलाताई पुय्यड, माजी आमदार संतोष टारपे, लोकसभा संघटक डॉ.मनोज भंडारी, माजी विरोधी पक्षनेते प्रमोद उर्फ बंडू खेडकर, युवासेनेचे जिल्हा युवाधिकारी गजानन कदम, बालाजी शिंदे , उप जिल्हा प्रमुख पपू जाधव,बबन बारसे, बाळासाहेब करहाळे, माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख, सचिन कीसवे, माजी नगरसेवक आनंद जाधव, रमेश कोकाटे, सुनील कदम, नवनाथ जोगदंड, रवी भिलवंडे, बाबासाहेब जोगदंड, माधव कल्याण, पुराभाजी पसदगावकर, महेश खेडकर, आवतरसिंग पहरेदर, व्यांकोबा येडे, भालचंद्र नाईक, रामचंद्र रेड्डी, राम कासरखेडकर, किशन फाटले, आयोध्या पौळ, प्रियांका कुंभार, रोहिणी कुळकर्णी, गीता कदम यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी तसेच शिवसेनेशी अंगिकृत असलेल्या संघटनांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पुण्यातील घटनेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्या पाठीवर शाब्बासकीची थाप देवून सन्मान केला. त्यांनी सांगितले की, एकीकडे देशाच्या सिमा रक्षण करण्यासाठी अहोरात्र आमचे सैनिक लढत आहेत, तर दुसरीकडे राज्यात गद्दारांच्या विरोधात माझा शिवसैनिक संघर्ष करत आहे.
बबनराव थोरात म्हणाले की, येणाऱ्या काळात आपल्याला गद्दारांना थोपविण्यासाठी डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. खऱ्याअर्थाने या राज्यात आता आपल्याला क्रांती घडवायची आहे, शिवसेनेच्या नावावर मोठे झालेल्या गद्दारांना आता तळागाळातील शिवसैनिक धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, त्यासाठी डोळ्यात तेल घालून तुम्हाला प्रत्येकाला काम करावे लागणार आहे. राज्यात पुन्हा एकदा क्रांती घडवत असताना तुमच्या सारख्या मावळ्यांची सोबत घेवून नांदेड आणि हिंगोली या दोन्ही जिल्ह्यात नवा इतिहास घडविताना गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी आपल्याला सज्ज व्हायचे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मोजक्याच मावळ्यांच्या सोबत संघर्ष व लढा देवून, लढाई करुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे आता आपल्याला ही लढाई जिंकायची असून, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हात आपल्याला बळकट करायचे आहेत, या जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात काय झाले याचा सर्व इतिहास आपल्याला माहित असून, या दोन्ही जिल्ह्यातील गद्दारांना धडा शिकविल्याशिवाय आता स्वस्थ बसायचे नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी शिवसेनेच्या नोंदणी संदर्भात आढावा घेवून जास्तीत जास्त नोंदणीचे काम आपल्या जिल्ह्यातून जातील असा विश्वास व्यक्त करुन शिवसेनेचे संघटन बळकट करण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज असल्याचे मत प्रतिपादीत केले. जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी याला थारा न देता संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी पूर्वीच्या काळात शिवसेनेला जे गतवैभव निर्माण करुन दिले, तीच परिस्थिती पुन्हा निर्माण करण्यासाठी गावपातळीवर शिवसेनेची मजबुत बांधणी हा एकमेव पर्याय असून, यासाठी सर्वांनी एकजुटीने एकदिलाने काम करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी त्यांचा जिल्ह्यातील विविध पदाधिकाऱ्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गजानन कदम, प्रकाश मारावार आदींचीही भाषणे झाली. शिवसैनिक अवतारसिंह पहरेदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.