वॉर्ड क्रमांक १७ च्या छत्रपती नगरातील नागरिक चिखलमय रस्ता व अंधाराने हैराण -NNL


हिमायतनगर|
शहरातील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये येणाऱ्या छत्रपती शिवाजी नगर भागाकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नळ योजनेची पाईपलाईन खोदल्यामुळे व ती व्यवस्थित न बुजवल्यामुळे अल्पसा पाऊस होताच सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरते. त्यामुळे रस्त्याने ये - जा करताना नागरिकांना कसरत करत मार्गक्रमण करावे लागते आहे. तसेच सार्वजनिक पथदिवे देखील बंद असल्यामुळे परिसरात चोऱ्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपंचायतीने लक्ष देऊन या भागातील नागरिकांची रस्त्याची व पथदिव्याची समस्या सोडवावी अशी मागणी केली जात आहे.    


हिमायतनगर येथील वार्ड क्रमांक १७ मध्ये रेल्वे स्टेशन रोड लगत असलेल्या छत्रपती शिवाजीनगर येथील रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांना ये जा करताना मोठा अडचणीतून जावे लागते आहे. नळ योजनेची पाईपलाईन खोदल्यामुळे व ती व्यवस्थित न बुजवल्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरीही सगळीकडे चिखलाचे साम्राज्य पसरते आहे. याबाबत अनेकदा सूचना देऊनही वार्ड क्रमांक १७ च्या नगर मधील तक्रारीची दखल कोणीही घेताना दिसत नाही. अशा या चिखलमय आणि खड्ड्याच्या रस्त्यातून रात्रीच्या अंधारात लहान मुलं तसेच म्हातारी माणसांना जावे लागते आहे.

वारंवार तक्रारी करून सुद्धा कोणीही लक्ष द्यायची तयारी ठेवत नाही. एक दिवस मुरूम टाकतो म्हणून पाहणी करून गेलेले पथक अजूनही मुरमासहित बेपत्ता आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात छत्रपती नगर मधील अर्धे लाईट बंदचा सामना या वॉर्डातील नागरिकांना करावा लागला होता. त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, आजघडीला देखील येथे अंधाराचे साम्राज्य असून, हा परिसर नवीन वसाहतीतील असून इकडे कोणीही लक्ष देताना दिसत नाही. लोकप्रतिनिधींना या नगराकडे लक्ष देण्यास वेळ नाही तुमच्या वसाहतीतील मतदानाचे प्रमाण कमी आहे या कारणास्तव आम्ही काही करू शकत नाही असे वारंवार उत्तर दिले जाते. फक्त मतदान जास्त आहे तिथेच सोयी पुरवायच्या अशा प्रकारची व्यवस्था नगरपंचायतीची दिसते असे यावरून वाटते आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी