अस्थिरोग शस्त्रक्रियांमध्ये केलेल्या संशोधनावर आधारित पाच रिसर्चपेपर्स सादर
नांदेड| शहरातील डॉ. श्रीनिवास चव्हाण या तरुण डॉक्टरांची इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ऑर्थोपेडिक सर्जरी आणि ट्रॉमॅटोलॉजी यांच्यावतीने क्वालालंपूर, मलेशिया येथे 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान आयोजित ऑर्थोपेडिक वर्ल्ड काँग्रेससाठी निवड झाली आहे. ते अस्थिरोग शस्त्रक्रियांमध्ये केलेल्या संशोधनावर आधारित पाच रिसर्चपेपर्स सादर करणार आहेत.
डॉ श्रीनिवास चव्हाण हे शहरातील प्रतिष्ठित ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ. प्रकाश चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. डॉ. श्रीनिवास यांनी सुवर्णपदकासह एमएस (अस्थिरोग) उत्तीर्ण केले असून त्यांना 'सर्वोत्कृष्ट पदव्युतर विद्यार्थी' आणि एमजीएम युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसमध्ये चॅन्सेलर्स गोल्ड मेडल देखील प्राप्त झाले आहे. त्यांनी यापूर्वी भारतीय ऑर्थोपेडिक असोसिएशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिषदेत रिसर्चपेपर्स सादर केले आहेत. त्यांचे विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन नियतकालिकांमध्ये रिसर्चपेपर्स प्रसिद्ध झाले आहेत.
विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे 2021 मध्ये महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनने आयोजित केलेल्या ऑर्थोपेडिक प्रश्नमंजुषामध्ये राज्यातील 22 वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांचा दुसरा क्रमांक पटकाविला होता. आता क्वालालंपूर, मलेशिया येथे 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑर्थोपेडिक परिषदेसाठी त्यांचे 5 रिसर्चपेपर्स निवडले गेले आहेत. हे रिसर्चपेपर्स ते त्या परिषदेत सादर करणार आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना मिळणारी ही एक दुर्मिळ संधी आहे.
डॉ. श्रीनिवास चव्हाण यांनी लहानपणापासूनच शैक्षणिकदृष्ट्या चांगली प्रगती केली आहे. त्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्व परीक्षा अर्थात सीईटी 2012 महाराष्ट्रामध्ये 89 वा क्रमांक पटकावून मुंबईतील प्रतिष्ठित एलटीएम (लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि सायन हॉस्पिटल) येथे एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. नंतर यांना अखिल भारतीय नीट पीजी प्रवेश परीक्षावर आधारित एमजीएम आरोग्य विज्ञान विद्यापीठ, औरंगाबाद येथे एमएस ऑर्थोसाठी प्रवेश मिळाला.
डॉ. श्रीनिवास चव्हाण यांचा ज्येष्ठ डॉक्टर आणि संशोधक पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांना ,डॉ. राजेंद्र शेवाळे, डॉ गिरीश गाडेकर, डॉ मंगेश पानट,एम जी एम वैद्यकीय महाविद्यालय यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे.यासाठी डॉ. श्रीनिवास यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.