नांदेड| रस्त्यांमध्ये प्रचंड मोठ-मोठे खड्डे, सर्वत्र घाणीच्या साम्राज्यामुळे नांदेड येथील एकमेव असलेल्या मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांसाठी असुविधांचे माहेरघर बनले आहे. मध्यंतरी बसस्थानकात प्रवाशांसाठी चांगले रस्ते व इतर सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिले होते. परंतु राज्यात सत्तांतर झाल्यानंतर हे आश्वासन हवेत विरले आहे. सतत सुरु असलेला पाऊस त्यातच बसस्थानकामध्ये जाण्यासाठी असलेला रस्त्यावर प्रचंड मोठ-मोठे खड्डे, ठिकठिकाणी कचर्याचे ढिग, कचरा सडल्याने सर्वत्र दुर्गंधी अशी दुरावस्था प्रवाशांना रोज सहन करावी लागत आहे.
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक मोठे असून त्याचे काम अर्धवट झाले असून व उर्वरित कामे चालू आहेत, त्यामुळे येथे येणार्या-जाणार्या प्रवाशांची भर पावसाळ्यात मोठी पंचायत होत असल्याचे पहावयास मिळत आहे. बसस्थानक परिसरात कामे चालू असल्यामुळे प्रवाशांना घाणीच्या साम्राज्याचा सामना करावा लागत आहे. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने प्रवाशांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मध्यवर्ती बसस्थानकातून मुदखेड, शिराढोण, कावलगाव, जैतापूर या ग्रामीण भागातील प्रवाशी मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. या गावावरुन मार्गक्रमण करणार्या बसेस गळक्या असून आणि मध्येच पंक्चर होतात.
तर मोठ्या प्रमाणात नादुरुस्त बसेस या मध्यवर्ती बस स्थानकात पहायला मिळत आहेत. परंतु कोणत्याही राजकीय व परिवहन मंत्री यांनी कोणतेही आतापर्यंत लक्ष दिले नाही. त्यामुळेच सध्या बसस्थानकातील परिस्थितीवरुन दिसून येते. जैतापूर जाणारी सहा वाजताची बस नेहमीच रद्द केली जाते. या संदर्भात वेळोवेळी अधिकार्यांना संपर्क साधूनही त्याचा काहीही परिणाम होत नाही. या भागात बसण्यासाठी जागा सुद्धा जागा उपलब्ध नसून पुरातन असलेले पत्राचे शेड पूर्ण नादुरुस्त आहे.
येथील पत्राची शेड पूर्ण गळत असून प्रवाशी महिला व विद्यार्थिनींना तसेच वयोवर्द्धांना पावसाळ्यात भिजावे लागत भिजावे लागत आहे.त्यात कहर म्हणजे या भागात दारुडे व पाकीटमारांचा सुळसुळाट झाला तो एक वेगळाच ताप एकंदरीत या सगळ्या प्रकाराकडे राजकीय तसेच सामाजिक संघटनांनीही सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानेच येथील समस्या वाढत आहेत. मुदखेडला जाणार्या-येणार्या विद्यार्थी-विद्यार्थींनींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या विद्यार्थ्यांना वेळेवर बस नाही लागली तर दुसर्या दिवशी पूर्ण त्यांच्या कॉलेजवर परिणाम होतो.
रिक्त पदे भरुन प्रवाशांना सुविधा उपलब्ध करुन द्या-आनंदा बोकारे
आजही ग्रामीण भागात एसटी हीच दळणवळणाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे नांदेड येथे मध्यवर्ती बसस्थानकातील कर्मचार्यांची रिक्त असलेली पदे त्वरित भरावीत, अंतर्गत रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, पत्रांचे शेड नवीन उभारण्यात यावे तसेच या पत्राच्या शेडमध्ये मोठ-मोठे कचर्याचे ढिगारे साचलेले तत्काळ हटवावे, अशी मागणी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते आनंदा बोकारे यांनी केली आहे.