मानवाडी फाटा येथे वृद्ध व्यक्तीचा बस खाली चिरडून मृत्यू
हदगाव, शे.चांदपाशा| तुळजापूर नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील गोजेगाव ते वारगा अर्धवट रोडच्या कामामुळे मानवाडी फाट्यावर नागपूर देगलूर जाणाऱ्या एमएच २० बीएल ४१०४ या क्रमांकाच्या देगलूर आगाराच्या बसने गणपतसींग गोविंदसिंग गहीरवाल (ठाकूर) वय ७० या वृद्ध व्यक्तीला चिरडले. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजता झाला. गणपतसींग यांचा रुग्णालयात पोहचण्यापुर्वीच मृत्यू झाला.
नागपूर तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपुर्ण असल्यामुळे मानवाडी फाट्याजवळ असलेल्या प्रसिद्ध हनुमान मंदिरातून दर्शन घेऊन लोक रोडवर येतात. या ठिकाणी सर्विस रोड आहे. परंतु या राष्ट्रीय महामार्गाचे काम अपूर्ण असल्यामुळे बाजूला संरक्षक कठडे बसवलेले नाहीत. त्यामुळे मंदिराकडून आलेले भाविक सरळ रोडवर येतात. त्यामुळे इथे अपघाताची मालिका नेहमी सुरू आहे.
आज शनिवार असल्यामुळे चिंचगव्हाण येथील गणपतसिंग गोविंदसिंग गहीरवाल (ठाकूर) हे भाविक मानवाडी येथील हनुमान मंदिरात दर्शन करून आडा येथे आपल्या नातेवाईकाकडे गेले होते. तिथून परत येवून आपल्या चिंचगव्हाण या गावाकडे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडून जात असतांना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. रोड ओलांडत असतांना वृद्धत्वामुळे त्यांना येणारी बस दिसली नाही. आणि ते सरळ सुसाट धावणाऱ्या बस खाली आले. मार एवढा जबरदस्त होता की त्याच ठिकाणी त्यांचा मेंदू बाहेर पडून तो वृद्ध बेहोष पडल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत.
शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांना एका कार्यकर्त्यांने भ्रमणध्वनीवरून माहिती दिली की, मानवाडी फाटा येथे एका व्यक्तीला एसटीची समोरासमोर धडक झाल्यामुळे तो व्यक्ती रस्त्यात जखमी अवस्थेत आहे. त्या व्यक्तीला कोणीही उचलण्यास तयार नाहीत, अशी माहिती जिल्हाप्रमुख यांना कळताच त्यांनी सदरील माहिती हदगांव युवा सेना तालुकाप्रमुख अमोल पाटील रुईकर यांना दिली. त्यांनी लगेच जाऊन आपल्या गाडीत त्या जखमी व्यक्तीला हदगाव येथे उपजिल्हा रुग्णालयात आणले. परंतु उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषित केले.
मानवाडी फाटा इथूनच निवघा, येहळेगाव, कळमनुरी मार्गे हिंगोलीकडे जाणारा राज्य महामार्ग आहे. या ठिकाणी अनेक वेळा या परिसरातील लोकांनी आणि निवघा रोडवरील अनेक गावांनी मानवाडी फाटा येथे उडान पूल करावा अशी मागणी केलेली आहे परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मात्र याची दखल घेतलेली नाही या ठिकाणी उडान पूल नाही झाल्यास दररोजच अपघात झाल्यास नवल वाटू नये.