माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चेने राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. खुद्द चव्हाणांनी आपण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा अफवा असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. महाराष्ट्रातील सकाळच्या शपथविधीने आणि एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारासह केलेल्या बंडाने राजकारणात काहीही होऊ शकते अशी आता लोकांची ठाम समजूत झाली आहे. त्यामुळे चव्हाणांच्या स्पष्टीकणानंतरही त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा थांबायचे नाव घेत नाहीत. परंतु या चर्चांच्या गुऱ्हाळात खरा महत्वाचा प्रश्न हा आहे की, चव्हाणांनी काँग्रेस सोडून भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश केला तर फायदा कोणाचा होणार?
राज्याच्या राजकारणात अशोक चव्हाण काँग्रेसचे बिनीचे नेते आहेत. दोन वेळा त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. भाजपला २०२४ मध्ये स्वबळावर ३५० खासदार निवडून आणायचे आहेत आणि त्यानंतर महाराष्ट्राची सत्ता स्वबळावर मिळवायची आहे. राज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा वगळता इतर भागात भाजपाने बऱ्यापैकी वर्चस्व मिळविले आहे. विदर्भात ज्या प्रमाणे भाजपाची ताकद आहे त्याप्रमाणे मराठवाड्यात भाजपची ताकद नाही. याचे कारण मराठवाड्यात शिवसेनेचे प्राबल्य जास्त आहे. शिवसेनेला नामोहरम करेल असा नेता आजमितीला भाजप जवळ नाही. अशोक चव्हाणांसारखा बाहुबली नेता जर गळाला लागला तर भाजपचे दोन हेतु साध्य होतील. चव्हाणांच्या मदतीने मराठवाड्यात शिवसेनेला नामोहरम करुन भाजपाच्या जागा वाढविता येतील. दुसरे शिवसेनेच्या जागा कमी होतील. भविष्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्या इतपत शिवसेनेची ताकद उरणार नाही.
शंकरराव चव्हाण ५० वर्षे राजकारणात केवळ सक्रीय राहिले नाही तर सदैव सत्तेतच राहिले. त्यानंतर अशोक चव्हाणही गेली २५-३० वर्षे सत्तेत राहिले. त्यामुळे त्यांचे समर्थक केवळ मराठवाड्यात नाही तर राज्यभर आहेत. त्याचा फायदा भाजपला होईल. मराठवाड्यात नांदेडवर तर चव्हाणांचे वादातीत वर्चस्व आहेच. शिवाय हिंगोली, परभणी, लातूर, औरंगाबाद, वाशीम या जिल्ह्यातही चव्हाणांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे चव्हाणांच्या पक्षांतराने काँग्रेसला मोठे खिंडार पडणार आहे. परंतु काँग्रेसपेक्षाही शिवसेनेला तडाखा देण्याच्या दृष्टीने चव्हाणांची मोठी मदत होणार असल्याने भाजप त्यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रयत्न करीत असावी हे नाकारता येत नाही. अशोक चव्हाण मराठा समाजातून येतात. राज्यात मराठा समाज बहुसंख्य आहे. मराठा आरक्षणासाठी जी समिती नेमण्यात आली होती, त्याचे अध्यक्षपदही अशोक चव्हाणांकडेच होते. राज्यात बहुसंख्येने असणाऱ्या समाजाचा एक शक्तीशाली नेता भाजपच्या गोटात येणार असेल तर त्याचा फायदा पक्षाला होईल या दृष्टीनेही भाजपमध्ये हालचाली सुरु असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशोक चव्हाणांसाठी हे पक्षांतर किती लाभदायक ठरेल हे मात्र सांगणे कठीण आहे. अगदी नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर यापूर्वी जिल्ह्यातील भास्करराव पाटील खतगावकर, सूर्यकांता पाटील, डाँ. माधवराव किन्हाळकर, स्व. बापूसाहेब गोरठेकर, सुभाष वानखेडे अशा अनेक नेत्यांनी यापूर्वी भाजप प्रवेश केला. काँग्रेस, राष्ट्रवादी मध्ये मोठी मोठी पदे भूषविलेली ही नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर घरी बसून आहेत. त्यांच्या क्षमतांचा, नेतृत्वाचा कोणताही विचार भाजपने गंभीरपणे केला नाही हे नाकारुन चालणार नाही. यापैकी भास्करराव पाटील, स्व. बापूसाहेब गोरठेकर, सुभाष वानखेडे हे स्वगृही परतले. भारतीय जनता पक्ष अशोक चव्हाणांची अशी अवस्था नक्कीच करणार नाही.
परंतु खरा प्रश्न हा आहे की, समजा चव्हाणांना आज काँग्रेस सोडायची झाल्यास त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल. विधान सभेत काँग्रेसचे ४४ आमदार आहेत. त्यापैकी २/३ आमदारांनी पक्षांतर केले तरच त्यांची आमदारकी शाबूत राहू शकते. चव्हाणांसोबत आजमितीला १२ आमदार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या बाराही आमदारांना राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर त्यांना भाजप किंवा शिंदे गटात प्रवेश करावा लागेल. खरी परीक्षा पुढे राहणार आहे. अशोक चव्हाणांच्या राजकारणाचा खरा आधार मुस्लीम मतदार आहे. मुस्लीम मतदारांच्या भरवंशावरच त्यांनी आतापर्यतच्या बहुतांश निवडणुका सहज जिंकल्या आहेत. नांदेड महापालिकाही केवळ मुस्लीम मतदारामुळेच चव्हाणांच्या ताब्यात आहे. समजा चव्हाणांनी पुढची निवडणूक भाजप अथवा शिंदे गटाकडून लढविली तर ही मुस्लीम मते चव्हाणांच्या बाजुने जातील का? याचे कारण सद्यस्थितीत भाजप आणि शिंदे गटाने कट्टर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे.
आपला देश धर्मनिरपेक्ष असला तरी निवडणुका धर्मनिरपेक्ष होत नाहीत हे वास्तव आहे. ते नाकारता येणार नाही. आतापर्यतच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर मुस्लीम मते भाजप किंवा शिवसेनेच्या (आता शिंदेगटही) पारड्यात अभावानेच जाताना दिसली. ही सर्व परिस्थिती पाहता अशोक चव्हाणांसाठी हे पक्षांतर दीर्घकाळ लाभदायी ठरेल अशी शक्यता नाही. या ऊलट त्यांचे पक्षांतर एमआयएमसाठी लाभदायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात एमआयएमचा राजकीय चंचुप्रवेश नांदेडमधूनच झाला होता हे विसरता कामा नये. चव्हाण यांनी यापूर्वी दोनवेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भुषविले आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये राजकीय सोय म्हणून चव्हाणांनी कँबिनेट मंत्रीपद स्वीकारले असले तरी त्यांचा अनुभव, योग्यता ही मुख्यमंत्रीपद मिळण्यासारखीच आहे.
परंतु भारतीय जनता पक्षात किंवा शिंदे गटात प्रवेश गेल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे. याचे कारण २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकानंतर देशाचे राजकारण एकदा पुन्हा आमुलाग्र बदलणार आहे. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीत चव्हाणांचे स्थान कोठे असेल हे सांगणे आज तरी कठीण आहे. अशोक चव्हाण राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रगल्भ नेते आहेत. आपल्या मनात काय चालले याचा थांगपत्ता ते कोणालाही लागू देत नाहीत. त्यामुळे त्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा जोर धरत आहेत. परंतु कायदेशीरदृष्ट्या अडचणीत नसतील तर ते काँग्रेस सोडण्याची शक्यता कमीच आहे. याचे कारण त्यांच्या पक्षांतराचा लाभ स्वत:पेक्षा भाजपला किंवा शिंदेगटाला अधिक होईल हे समजण्या इतपत प्रगल्भता त्यांच्यात निश्चित आहे. परंतु राजकारणात काहीही होऊ शकते हेही तेवढेच खरे आहे.
विनायक एकबोटे, ज्येष्ठ पत्रकार नांदेड दि. ३-९-२२, मो.नं. 7020385811